Join us  

मुंबईत तिसरी लाट येणार नसेल तर गरब्याला परवानगी द्या; भाजपाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 4:08 PM

कोरोनाचे कारण पुढे करत हिंदू सणांवर बंदी घालण्याचे सत्रच महाविकास आघाडी सरकारने सुरु केले आहे. मंदिरे सुरु करण्यासाठी सुद्धा कोरोनाचे कारण पुढे करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत झालेल्या लसीकरणामुळे कोरोनाची तिसरी लाट येणे शक्य नसल्याचे मुंबई महानगरपालिकेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून मान्य केले आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण पुढे करत मुंबईत गरब्यावर घालण्यात आलेली बंदी मागे घेत घटस्थापनेपासून सुरु होणाऱ्या गरब्याला कोरोनाच्या नियमावलीसह परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपाचे मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

कोरोनाचे कारण पुढे करत हिंदू सणांवर बंदी घालण्याचे सत्रच महाविकास आघाडी सरकारने सुरु केले आहे. मंदिरे सुरु करण्यासाठी सुद्धा कोरोनाचे कारण पुढे करण्यात आले होते. हिंदू सणाच्या निमित्ताने मोठी आर्थिक उलाढाल होत असते, मात्र मागील वर्षभराच्या काळात हिंदू सणांवर घालण्यात आलेल्या बंदी मुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांवर बेरोजगारीचे संकट आले आहे. परंतू मुंबई महानगरपालिकेनेच आता तिसरी येणार नसल्याचे स्वतःच मान्य केले आहे. त्यामुळे घटस्थापनेपासून सुरु होणाऱ्या गरब्यासह आगामी काळात येणारे सर्वहिंदू सण सार्वजनिकरित्या साजरे करण्यास परवानगी द्यावी.

तसेच भाजपच्या आंदोलनानंतर ठाकरे सरकारने सर्वसामान्य मुंबईकरांकरिता लोकल प्रवासाची मुभा दिली खरी, मात्र लोकलने प्रवास करण्यासाठी मासिक पास असणे बंधनकारक करण्यात आले. त्यामुळे आठवड्यातून एखाद्या वेळी किंवा अत्यावश्यक कारणांसाठी मुंबईत प्रवास करणाऱ्या अनेक सामान्य मुंबईकरांची परवड होत आहे. त्यामुळे कोरोनाचे दोन्ही डोस घेतले असतील अशा नागरिकांना सुद्धा लोकलने प्रवास करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी सुद्धा आमदार भातखळकर यांनी केली आहे.

टॅग्स :नवरात्रीअतुल भातखळकर