Join us

घरांचे सर्वेक्षण केले नसल्यास तुम्हीच पुढे या; धारावीतील रहिवाशांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 12:48 IST

आता सर्वेक्षण झालेल्या भागांमध्ये नव्याने भेटी देण्यात येणार नाहीत.

मुंबई : धारावी पुनर्विकास प्राधिकरणाने (डीआरपी) झोपड्यांच्या पात्र आणि अपात्रेसाठी घरोघरी जाऊन हाती घेतलेले सर्वेक्षण अखेर मंगळवारी पूर्ण झाले आहे. एकूण ८७ हजार ५०० झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, एक लाखांहून अधिक झोपड्यांना क्रमांक दिले आहेत. मात्र, ज्यांनी अद्याप सर्वेक्षण पूर्ण केलेले नाही, अशा सर्वांनी त्वरित पुढे येऊन आपले घर क्रमांकित करून पुनर्विकासाच्या लाभासाठी आपली पात्रता निश्चित करावी, असे आवाहन 'डीआरपी'ने केले आहे.

'डीआरपी' प्रशासनाने जुलैमध्ये जाहीर केल्यानुसार घरोघरी भेट देऊन सर्वेक्षणाकरिता ठरवलेली डेडलाइन १२ ऑगस्टला पूर्ण झाली आहे. अंतिम मुदतीची माहिती देण्यासाठी परिसरात पोस्टर्स लावले होते.

मसुदा अनुसूची-२ नंतरच अर्जाची संधी

आता सर्वेक्षण झालेल्या भागांमध्ये नव्याने भेटी देण्यात येणार नाहीत. त्यामुळे या कालावधीत ज्यांनी सर्वेक्षण करून घेतलेले नाही, अशांना या प्रक्रियेत स्वेच्छेने सहभाग घेतला नसल्याचे गृहीत धरण्यात येईल.

तथापि, मसुदा अनुसूची - २ जाहीर झाल्यानंतर अशा नागरिकांना अर्ज सादर करण्याची संधी मिळणार आहे. 

टॅग्स :मुंबईधारावी