Join us  

शिवसेनेने साथ सोडली तर भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागेल- अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 5:04 PM

मध्यावधी निवडणुका लागल्यास निकाल काय लागेल, याचा साधकबाधक विचार शिवसेनेने केलाच असेल.

मुंबई: शिवसेनेने साथ सोडली तर आपल्याला विरोधी पक्षात बसावे लागेल, याची जाणीव भाजपाच्या नेत्यांना झाली आहे. त्यामुळेच भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी शिवसेनेची मनधरणी करायला सुरुवात केली आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले. ते गुरुवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांना शिवसेना सरकारमधून बाहेर पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला पाठिंबा देणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अजित पवार यांनी म्हटले की, उद्या असं काही घडलंच तर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही 2014 पेक्षा वेगळी असेल, हे शरद पवारांनी यापूर्वीच स्पष्ट केल्याचे अजितदादांनी सांगितले. शिवसेनेने सरकाराचा पाठिंबा काढल्यास राज्यात मध्यावधी निवडणुका होतील. त्याचा निकाल काय लागेल, याचा साधकबाधक विचार शिवसेनेने केलाच असेल. मात्र, दुसरीकडे भाजपाची धोरणे ठरवणाऱ्या नेत्यांनी शिवसेनेची मनधरणी करायला सुरूवात केली आहे. चंद्रकांत पाटील, नितीन गडकरी आणि स्वत: पक्षाध्यक्ष अमित शहा हे जाहीरपणे शिवसेनेशी युती करावीच लागेल, असे जाहीरपणे सांगतात. यावरून एक स्पष्ट होते की, शिवसेनेची साथ सोडल्यास आपल्याला विरोधी पक्षात बसावे लागेल, याची स्षष्ट जाणीव या नेत्यांना झाली आहे. त्यामुळे भविष्यात वेळ पडल्यास हे भाजपा नमते घेईल आणि शिवसेनेला जास्त जागा देईल, अशी शक्यताही यावेळी अजित पवार यांनी वर्तविली. 

टॅग्स :अजित पवारशिवसेनाउद्धव ठाकरे