Join us

"मला जर पुन्हा संधी मिळाली, तर मी पुन्हा असं करेन""; आर्यन खान प्रकरणाबद्दल समीर वानखेडे आता काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 20:14 IST

अँटेलिया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आली होती. समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचेही आरोप त्यावेळी झाले होते. 

Sameer Wankhede Aryan khan: २०२१ मधील ड्रग्ज प्रकरण, आर्यन खान अटक आणि शाहरुख खानसोबतचे चॅट व्हायरल झाल्याच्या मुद्द्यावर तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंनी नव्याने भूमिका केले आहे. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर लाच मागीतल्याचेही आरोप झाले होते.

2021 मध्ये उघडकीस आलेल्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. एनसीबीने एका क्रूजवर टाकलेल्या धाडीनंतर आर्यनला ताब्यात घेण्यात आले होते. आर्यन खान या प्रकरणात २५ दिवस तुरुंगात रहावे लागले. त्यानंतर त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. हे प्रकरण घडले तेव्हा समीर वानखेडे एनसीबीच्या मुंबई विभागाचे संचालक होते. 

समीर वानखेडे यांनी 'न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल भाष्य केले. "मी असं म्हणणार नाही की, मला लक्ष्य करण्यात आलं. पण, असं म्हणेन की, मी सर्वात नशिबवान माणूस राहिलो आहे. कारण मला मध्यम वर्गीय लोकांचे खूप प्रेम मिळाले. कधी कधी मला वाटतं की, मला जे प्रेम मिळालं आहे, त्यामुळे हे सगळ्यांना सहन करता आलं. त्यांच्या नजरेत मी कधीही मोठा झालो असलो, तरी कायद्यासमोर सगळे समान या न्यायाने सामोरं गेलं पाहिजे. मला कोणताही पश्चाताप नाहीये. पण, मला जर पुन्हा संधी मिळाली, तर मी पुन्हा असं करेन", असे वानखेडे म्हणाले. 

शाहरूख खान चॅट लीक बद्दल काय म्हणाले वानखेडे?

शाहरुख खानच्या चॅट लीकबद्दल समीर वानखेडेंना विचारण्यात आले. ज्यात आर्यन खानविरोधातील गुन्हा रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. समीर वानखेडेंनी यावर बोलण्यास नकार दिला. न्यायालयातील शपथपत्राचा त्यांनी उल्लेख केला आणि कोर्टाने यावर न बोलण्यास बंदी घातलेली असल्याचे सांगितले. 

याच मुद्द्यावर वानखेडे म्हणाले, "मी इतका कमकुवत नाही की, मी गोष्टी लीक करेन." शाहरुख खान आणि आर्यन खान यांना जास्त पीडित असल्याचे दाखवण्यासाठी ते केले गेले होते का, असा प्रश्न विचारण्यात आला. वानखेडे म्हणाले, "ज्याने कुणी असे केले होते, मी त्याला सांगेन की, आणखी प्रयत्न करावा."

25 कोटी रुपये लाच मागितल्याच्या आरोपावर बोलताना वानखेडे म्हणाले, "मी त्याला कधी सोडले नाही, उलट मी त्याला पकडले होते. प्रकरण न्यायालयात आहे आणि मला आपल्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. जेव्हा मी मुंबई विमानतळावर डीसीपी होतो, तेव्हा माझ्या आणि शाहरुख खानमध्ये खूप आदराचे संबंध होते."

आर्यन खानला त्यावेळी एनसीबीने खूप त्रास दिला, असा आरोप त्यावेळी लागला. यावर समीर वानखेडे म्हणाले, "मला वाटतं की मी कोणत्याही मुलाला अटक केली नव्हती. वयाच्या २३ व्या वर्षी भगतसिंगांनी देशासाठी आपले प्राण दिले. तुम्ही त्यांना मुलगा नाही म्हणू शकत", असे उत्तर समीर वानखेडेंनी दिले. 

टॅग्स :समीर वानखेडेआर्यन खानशाहरुख खानअमली पदार्थनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो