आग दिवसा लागली असती तर...
By Admin | Updated: October 26, 2015 02:19 IST2015-10-26T02:19:01+5:302015-10-26T02:19:01+5:30
क्रॉफर्ड मार्केटला पहाटे आग लागली आणि दक्षिण मुंबई खाडकन जागी झाली. महापालिकेला पोलीस नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच सगळ्याच संबंधित यंत्रणांना तातडीने माहिती देण्यात आली.

आग दिवसा लागली असती तर...
मुंबई : क्रॉफर्ड मार्केटला पहाटे आग लागली आणि दक्षिण मुंबई खाडकन जागी झाली. महापालिकेला पोलीस नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच सगळ्याच संबंधित यंत्रणांना तातडीने माहिती देण्यात आली. सगळे प्रमुख अधिकारीदेखील आग शांत होईपर्यंत अलर्टवर होते. अग्निशमन दल अत्यंत वेगाने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीला आटोक्यात आणले. जर आग दिवसा लागली असती, तर चिंचोळ्या गल्ल्यांमुळे आणि अत्यंत रहदारीच्या या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती.
रविवारी पहाटे ५.१९ वाजता मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाकडून महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला क्रॉफर्ड मार्केटमध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्यानंतर तत्काळ आपत्कालीन कक्षाकडून ही माहिती अग्निशमन नियंत्रण कक्ष, बीईएसटी नियंत्रण कक्ष, मलबार हिल पाणी नियंत्रण कक्ष, विभागीय नियंत्रण कक्ष, सहायक आयुक्त (ए विभाग), सहायक आयुक्त (बाजार), मंत्रालय नियंत्रण कक्ष आणि वाहतूक नियंत्रण कक्षाला देण्यात आली. शिवाय १०८ रुग्णवाहिका व नायर रुग्णालयातील ईएमएस व्हॅनला तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. महत्त्वाचे म्हणजे घटनास्थळापासून जवळ असणाऱ्या रुग्णालयातील अपघात विभागांना सज्ज राहण्याच्या सूचना तातडीने देण्यात आल्या. या दुर्घटनेची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना कळविण्यात आली.
पहाटे साडेपाचला लागलेली आग ही १ नंबरची वर्दी असल्याने अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून काम सुरू केले. साडेसहा वाजता ही आग २ नंबरची वर्दी म्हणून घोषित करण्यात आली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न करून अखेर सकाळी ८ वाजता चारही बाजूंनी आग कव्हर केली. सकाळी ९ वाजता आग पूर्णपणे विझविण्यात आली. (प्रतिनिधी)