मुंबई : चाळी, सेस इमारतींचा पुनर्विकास करताना समूह विकास (क्लस्टर) योजना लागू केली तर प्रत्येक घराला एक पार्किंग मिळू शकेल. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न भेडसावणार नाही. त्यामुळे पार्किंग असेल तरच कार विकत घ्या, असा नियम करण्याऐवजी गृहनिर्माण धोरणांत बदल करत क्लस्टरला प्राधान्य देत इमारतींचा पुनर्विकास करा, असे गृहनिर्माण अभ्यासकांनी सांगितले.
पार्किंगसाठी जागा नाही तर कार घेता येणार नाही, असा नियम राज्य सरकार लवकरच लागू करणार आहे. ज्यामध्ये कार खरेदीपूर्वी पार्किंगची जागा सांगावी लागणार आहे. वाहतूक कोंडीमुळे हा निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा असतानाच गृहनिर्माण अभ्यासकांनी पार्किंगच्या विषयाकडे लक्ष वेधले आहे.
... तर प्रश्न सुटू शकतो गिरगाव, ग्रँटरोड परिसरात चारशे ते सहाशे चौरस मीटर परिसरावर बॉक्स टाइपमध्ये दहा ते बार मजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. एका इमारतीमध्ये ३५ घरे आहेत. मात्र, त्यांना त्यांची वाहने रस्त्यावर उभी करावी लागत आहेत; कारण इमारत बांधताना पुरेशा पार्किंगचा विचार करण्यात आला नाही. दोन प्लॉट एकत्र करून क्लस्टर केले, तर पार्किंगचा प्रश्न सुटू शकतो, असे गृहनिर्माण अभ्यासकांनी सांगितले.
चाळी, धोकादायक इमारतींचा एकत्रित पुनर्विकास केल्यास पार्किंगसाठी मोठी जागा उपलब्ध होईल. यासाठी दक्षिण मुंबईत क्लस्टरचा प्राधान्याने विचार करावा लागेल. मात्र, आपल्याकडे गृहनिर्माण धोरणावर जोर देण्याऐवजी पार्किंग धोरणावर जोर दिला जातो हे, दुर्दैव आहे.- डॉ. सुरेंद्र मोरे, गृहनिर्माण अभ्यासक