Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिल नाही भरले, तर १५ तारखेला वीज कापणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 05:57 IST

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याबाबत देण्यात येणाऱ्या यादीतील ग्राहकांची वीज महिन्याच्या १५ तारखेपर्यंत खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई : मुख्य कार्यालयाकडून दरमहा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याबाबत देण्यात येणाऱ्या यादीतील ग्राहकांची वीज महिन्याच्या १५ तारखेपर्यंत खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषत: शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह सर्व वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात दरमहा दिले जाणारे वीजबिल वसुलीचे उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष वसुली यात लक्षणीय फरक आहे. परिणामी, आर्थिक वर्षाच्या शेवटी थकबाकीच्या रकमेत होणारी वाढ महावितरणच्या आर्थिक परिस्थितीला मारक ठरेल. त्यामुळे दरमहाच्या वसुलीचे लक्ष्य त्याच महिन्यात शंभर टक्के पूर्ण करण्यासोबतच थकबाकीदारांचा वीजपुरवठा तत्काळ खंडित करा, असे निर्देश कोकण विभागाचे प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत. नाळे यांनी कोकण विभागातील कल्याण, भांडुप, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडलांचे मुख्य अभियंता, सर्व अधीक्षक अभियंते आणि कार्यकारी अभियंते यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग घेतली. थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर पुन:जोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत केला जात नाही. त्यामुळे ग्राहकांनी थकबाकी आणि चालू वीजबिल भरून सहकार्य करीत संभाव्य गैरसोय टाळावी, असे आवाहन करण्यात आले.