विठ्ठल-रुख्मिणीची ‘ती’ मूर्ती मुख्यमंत्र्यांच्या देवघरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:21 IST2018-07-24T00:19:45+5:302018-07-24T00:21:04+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून गेल्यावर्षी बचावले होते

विठ्ठल-रुख्मिणीची ‘ती’ मूर्ती मुख्यमंत्र्यांच्या देवघरात
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निलंगा (जि.लातूर) येथे हेलिकॉप्टर अपघातात गेल्यावर्षी बचावले तेव्हा हेलिकॉप्टरमध्ये असलेली विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती वर्षा बंगल्यावरील त्यांच्या देवघरात विराजमान आहे आणि सोमवारी पहाटे त्यांनी याच मूर्तीची सपत्नीक पूजा केली.
२४ मे २०१७ रोजी मुख्यमंत्री जलयुक्त शिवारच्या कामांची पाहणी करण्यासाठी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. खरोसा टेकडीवर कीर्तनाचा कार्यक्रम होता. वसंत पाटील या भाजपाच्या कार्यकर्त्याने विठ्ठल-रूख्मिणीची हीच मूर्ती मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून दिली होती. दुसºया दिवशी काही गावांच्या भेटी आटोपून परतीच्या प्रवासाला मुख्यमंत्री निघाले. तेव्हा हेलिकॉप्टरचा अपघात झाला. त्यात मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी सुखरुप बचावले.
माऊलींचा आशीर्वाद
मुख्यमंत्र्यांनी सोमवारी टिष्ट्वट करून म्हटले आहे की, मी अंधश्रद्धा मानत नाही. पण, आम्ही बचावलो हा तर माऊलींचाच आशीर्वाद होता. तेव्हापासूनच ती मूर्ती माझ्या देवघरात रोजच्या पूजेत आहे. आज काही कारणांमुळे प्रत्यक्ष पंढरपुरात माऊलीचे पूजन करता आले नाही. पण, वर्षा या शासकीय निवासस्थानी कुटुंबीयांसह मनोभावे, भक्तीभावे विठोबा-रखुमाईच्या त्याच मूर्तीची मी पूजा केली.