Join us  

दहिसर बोरीवलीत राबवली जाणार मूर्ती दान योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 6:45 PM

कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतांना गणेश मूर्ती 4 फूटांच्या आत ठेवा.

मनोहर कुंभेजकर

मुंबई : कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतांना गणेश मूर्ती 4 फूटांच्या आत ठेवा असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अलीकडेच केले होते.तर कोरोनामुळे यंदा आर्थिक गणित बिघडल्याने व दरवर्षी मिळणाऱ्या देणग्या व वर्गणी मिळण्याची शक्यता कमी असल्याने गणेशोत्सव कसा साजरा करायचा या विवंचनेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत.त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत दहिसर व बोरीवलीतील शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना 2 फूटी पेण येथील प्रसिद्ध पर्यावरण पूरक शाडूची मूर्ती व पूजेचे साहित्य देणगी स्वरूपात देण्याचा संकल्प केला आहे.

 पालिकेच्या विधी समिती अध्यक्ष व शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 7 च्या नगरसेविका शीतल म्हात्रे व प्रभाग क्रमांक 11 च्या शिवसेनेच्या नगरसेविका रिद्धी खुरसंगे व माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे यांनी त्यांच्या भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सदर गणेश मूर्ती व पूजेचे साहित्य यांची येत्या 20 जुलै पर्यंत त्यांच्या आवडीची मूर्ती नोंदणी करा असे आवाहन त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या प्रभागातील मंडळांना केले आहे.

आमच्या प्रभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ही योजना मर्यादित असून खास पर्यावरण पूरक 2 फूटी शाडूच्या मूर्ती व पूजेच्या साहित्याचे ताट आम्ही येथील मंडळांना देणगी स्वरूपात दान करणार आहोत असे शीतल म्हात्रे यांनी सांगितले. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये आणि गणपती विसर्जनाला नागरिकांची गर्दी होऊ नये आमच्या प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांनी त्यांच्या सोसायटीत कृत्रिम तलाव उभारावा असे आवाहन करायला आम्ही सुरवात केली आहे.पालिका प्रशासनाने यंदा मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलाव नागरिकांना उपलब्ध करून घ्यावे यासाठी प्रशासना बरोबर बोलणी चालू असल्याची माहिती त्यांनी दिली.तसेच निसर्ग वादळामुळे मोठे नुकसान झालेल्या पेणच्या मूर्तीकारांना आर्थिक हातभार लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रभाग क्रमांक 11 मध्ये सुद्धा 2,3 व 4 फूटी आवडीच्या मूर्ती व पूजेचे साहित्य देणगी स्वरूपात आम्ही देणार असून या योजनेला येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे भास्कर खुरसंगे यांनी सांगितले. गणपती विसर्जनासाठी आमच्या प्रभागात  कृत्रिम तलाव मोठ्या संख्येने उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :गणेशोत्सवकोरोना वायरस बातम्यापर्यावरणमुंबई