प्रचारासाठी साधला ईदचा मुहूर्त

By Admin | Updated: October 7, 2014 02:13 IST2014-10-07T02:13:28+5:302014-10-07T02:13:28+5:30

मतदानाच्या दिवसाचे ‘काउंट डाऊन’ सुरू झाल्याने उमेदवारांना आपल्या मतदारसंघातील अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याची घाई झाली

Id for the promotion of Idla for the campaign | प्रचारासाठी साधला ईदचा मुहूर्त

प्रचारासाठी साधला ईदचा मुहूर्त

जमीर काझी, मुंबई
मतदानाच्या दिवसाचे ‘काउंट डाऊन’ सुरू झाल्याने उमेदवारांना आपल्या मतदारसंघातील अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याची घाई झाली असून, त्यासाठी विविध निमित्त शोधत वेगवेगळ््या माध्यमांचा वापर केला जात आहे. सोमवारी साजरी झालेली मुस्लीम बांधवांची ईद-उल-अजहा (बकरी ईद) ही त्यासाठी सुवर्णसंधी ठरली.
ईदगाह मैदान व मोठ्या मशिदींजवळ सामूहिक नमाज पठणासाठी मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने जमले होते. या एकाच ठिकाणी हजारो नागरिक भेटत असल्याने उमेदवारांचा भल्या सकाळी प्रचाराचा पहिला टप्पा कसलीही वाद्ये, घोषणा आणि जयजयकाराविना आपसूकच पार पडला. प्रत्यक्ष भेटीबरोबर मुस्लीम बांधवांना मोबाइल, व्हॉट्सअ‍ॅपवरून शुभेच्छांचे मेसेज देत मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्याचप्रमाणे शुभेच्छा पत्रकेही वाटण्यात आली होती.
शहर व उपनगरांतील सर्व ईदगाह मैदाने व मोठ्या मशिदींच्या बाहेर उमेदवारांनीही सकाळीच हजेरी लावली होती. ईदची नमाज पडून बाहेर पडणाऱ्या मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देत आपल्या ‘उमेदवारी’ची कल्पना देत होते. काही उमेदवार डोक्यावर टोपी, खांद्यावर मफलर ठेवीत मुस्लीम पेहराव करीत नागरिकांना गुलाबपुष्प देऊन नमस्कार व आलिंगनाचे सोपस्कार पार पाडीत होते. त्यांच्या कार्यकर्त्यांची फौजही त्यांच्यासोबत हजर होती. दक्षिण मुंबईत पायधुनी, भेंडी बाजार, नागपाड्यासह मुंबई सेंट्रल, माहीम, वांद्रे, अणुशक्तीनगर, चांदिवली, शिवाजीनगर, गोवंडी ,मानखुर्द, कलिना, अंधेरी, मालाड आदी भाग मुस्लीमबहुल आहे. त्याचप्रमाणे सर्व मतदारसंघांमध्ये मुस्लीम मतांचे प्रमाण लक्षणीय आणि निर्णायक ठरणारे असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर शिवसेना, भाजपा व मनसेचे उमेदवार त्यांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पक्षाची विचारधारा कशीही असो, आपण धार्मिक एकात्मता, सहिष्णुता आणि बंधुभावाला महत्त्व देत असल्याची साक्ष देणारी पत्रके उर्दूमधून छापून मुस्लीमबहुल वस्तीत वाटली जात आहेत. सध्या उमेदवार आपापल्या मतदारसंघातील चौक, गल्लीबोळातून पदयात्रा काढत असले, तरी पुरुष मतदारांची अभावानेच भेट होते. बकरी ईदच्या निमित्ताने त्यांना एकाच ठिकाणी भेटण्याची आयती संधी उपलब्ध झाली होती.
ईदची नमाज सर्वत्र सकाळी ६.५० ते ७.३० या वेळेत होती. त्यामुळे प्रचारात मध्यरात्रीपर्यंत जागलेले उमेदवारही ईदगाह मैदान व मशिदींबाहेर हजर होते. नमाज पडून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला हस्तांदोलन करीत ईदच्या शुभेच्छा देत होते, काहींनी गुलाबपुष्प वाटून, अत्तर लावून स्नेह वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केल्याचे यानिमित्ताने दिसून आले.

Web Title: Id for the promotion of Idla for the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.