Join us

ICC World Cup 2019 : लंकेचा आफ्रिकेविरुद्ध विजयाचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 04:48 IST

यजमान इंग्लंडविरुद्ध विजय मिळविल्याने आत्मविश्वास उंचावलेला श्रीलंका संघ विश्वचषकातील ‘करा किंवा मरा’अशी स्थिती असलेल्या सामन्यात द. आफ्रिकेविरुद्ध विजयाच्या निर्धारानेच उतरणार 

चेस्टर ली स्ट्रीट : यजमान इंग्लंडविरुद्ध विजय मिळविल्याने आत्मविश्वास उंचावलेला श्रीलंका संघ विश्वचषकातील ‘करा किंवा मरा’अशी स्थिती असलेल्या सामन्यात द. आफ्रिकेविरुद्ध विजयाच्या निर्धारानेच उतरणार आहे. इंग्लंडवर लंकेने २० धावांनी विजय नोंदविल्यामुळे उपांत्य फेरीचे चित्र अधिक उत्कंठा वाढविणारे बनले आहे.श्रीलंका दोन विजयांमुळे सहा गुणांसह सातव्या स्थानावर असून उपांत्य फेरीसाठी उर्वरित तिन्ही सामने जिंकावे लागतील. एकीकडे मोहिमेत प्राण फुंकण्यासाठी लंकेची धडपड सुरू असून दुसरीकडे स्पर्धेबाहेर झालेला द. आफ्रिका क्षमता दाखविण्याचा प्रयत्न करणार आहे. मागच्या विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणारा हा संघ पाककडून यंदा ४९ धावांनी पराभूत होताच स्पर्धेबाहेर झाला. चुकांपासून बोध घेण्यात अपयशी ठरलेल्या आफ्रिकेकडे आता गमविण्यासारखे काहीच राहिलेले नाही, त्यामुळे विजय मिळवून इभ्रत शाबूत राखण्याचे संघाचे प्रयत्न असतील. पाकविरुद्ध पराभवानंतर  द. आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसिस याने स्वत:ची निराशा  जाहीर केली होती. एक पाऊल  पुढे जात दोन पाऊल मागे होणे चांगल्या संघाचे लक्षण नाही. आम्ही चुकांची पुनरावृत्ती करीत असल्यामुळेच अपमानास्पद पराभवाचे तोंड पहावे लागले, असे तो म्हणाला होता.उभय संघांना फलंदाजीची चिंता आहे. गोलंदाजीत मात्र लसिथ मलिंगाच्या बळावर लंका संघ  सरस वाटतो. लंकेला द. आफ्रिकेवर विजय मिळवायचा झाल्यास  त्यांच्या फलंदाजांना उत्कृष्ट खेळ करावा लागेल, शिवाय गोलंदाजांना धावसंख्येचा बचाव करण्याइतपत भेदक मारा करावाच लागेल. (वृत्तसंस्था) 

 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019श्रीलंकाद. आफ्रिका