तोतया आयएएस अधिकारी गजाआड

By Admin | Updated: December 21, 2014 02:01 IST2014-12-21T02:01:38+5:302014-12-21T02:01:38+5:30

आयएएस, आयबीचे उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे भासवून अनेकांना गंडविणाऱ्या त्रिकुटाला बोरिवली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

IAS Officer GajaAd | तोतया आयएएस अधिकारी गजाआड

तोतया आयएएस अधिकारी गजाआड

मुंबई : आयएएस, आयबीचे उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे भासवून अनेकांना गंडविणाऱ्या त्रिकुटाला बोरिवली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या तिघांनी कॉन्ट्रॅक्ट देतो, नोकरीला लावतो, स्वस्तात घर मिळवून देतो, अशा थापा मारून लाखो रुपये उकळल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. या तिघांकडून बोगस, बनावट कागदपत्रेही सापडली आहेत.
अश्विन सुपरा (३६), विनोद झा (४१), अनिल चौधरी (४६) अशी त्यांची नावे आहेत. हे त्रिकूट गेल्या काही दिवसांपासून बोरिवलीच्या आर. एम. भट्ट रोडवरील एका हॉटेलमध्ये थांबून सावज शोधत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका पत्रकाराला जाळ््यात ओढण्याचा प्रयत्न केला. आयबीचे कॉन्ट्रॅक्ट देतो, असे सांगून त्याच्याकडून २० हजार रुपयेही उकळले होते. मात्र मधल्या काळात या पत्रकाराला संशय वाटल्याने त्याने बोरिवली पोलिसांना हा प्रकार सांगितला. दरम्यान, बोरिवली पोलिसांनी वेशांतर करून पत्रकारालासोबत या त्रिकुटाची भेट घेतली. पोलिसांनी या तिघांना त्यांची बॅच विचारली. या प्रश्नांची उत्तरे देताना तिघांनाही घाम फुटला. तिघांनी उलटसुलट, खोटी उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. अखेर तिघांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्यात त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. तेव्हा तिघेही भामटे असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनीही फसवणुकीची कबुली दिली.

मुख्य आरोपी अश्विन हा मूळचा झारखंड येथील रहिवासी आहे. तो लोकांना मोबाईल फोनमध्ये स्वत: आयएएस असल्याचे ओळखपत्र दाखवून फसवतो. विनोद झा कांदिवली येथील असून चौधरी हा पोईसर येथील रहिवासी आहे.

Web Title: IAS Officer GajaAd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.