Join us
Daily Top 2Weekly Top 5

“कधीही आवाज द्या, मी साथ देईन, कारण...”; नवाब मलिकांविरोधात ‘हिंदुस्तानी भाऊ’चा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 11:08 IST

नवाब मलिकांनी मोहित कंबोज यांच्यावर ११०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. तसेच आर्यन खान अपहरण आणि वसुलीचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा दावा मलिकांनी केला आहे

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्स प्रकरणावरुन रोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात मंत्री नवाब मलिकांनी मोर्चा उघडला आहे. सातत्याने मलिक वानखेडे कुटुंबीयांविरोधात आरोप करत आहेत. त्याचसोबत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणामुळे राज्यात ड्रग्सचा धंदा चालत असल्याचा गंभीर आरोप मलिकांनी केला. सध्या नवाब मलिक आणि भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.

नवाब मलिकांनी मोहित कंबोज यांच्यावर ११०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. तसेच आर्यन खान अपहरण आणि वसुलीचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा दावा मलिकांनी केला आहे. नवाब मलिकांच्या या आरोपावर मोहित कंबोज यांनीही प्रत्युत्तर देत मलिक वैफल्यग्रस्त झालेत असा घणाघात केला आहे. या प्रकरणात आता सोशल मीडियातील प्रसिद्ध चेहरा हिंदुस्तानी भाऊ उतरला आहे. हिंदुस्तानी भाऊनं मोहित कंबोज यांच्या पाठिंब्यासाठी व्हिडीओ बनवला आहे.

हिंदुस्तानी भाऊ(Hindustani Bhau) व्हिडीओत म्हणतो की, मोहित कंबोज तुम्ही खूप चांगले काम करत आहात. तुम्ही नशेडी, गंजेडी लोकांविरोधात तुम्ही जे आंदोलन उभं केले आहे. जे पाऊल उचललं आहे त्याच्या सपोर्टसाठी मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही जेव्हा कधीही तुम्ही बोलावल मी प्रत्येकवेळी हजर असेन असं तो म्हणाला आहे.   

कोण आहे हिंदुस्तानी भाऊ?

हिंदुस्तानी भाऊ सोशल मीडियात आपल्या व्हिडिओसाठी खूप प्रसिद्ध आहे. रोखठोक आणि बेधडक भूमिकेसाठी हिंदुस्तानी भाऊची तरुणाईमध्ये खूप क्रेझ आहे. यावरुनच त्याची बिग बॉससाठी निवड झाली होती. या कार्यक्रमातही 'हिंदुस्तानी भाऊ'नं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. देशाविरोधात भाष्य करणाऱ्यांना 'हिंदुस्तानी भाऊ' त्याच्या शैलीत फिरकी घेतो. भाऊचे टिकटॉकवर 6 लाखाहून अधिक फॉलोअर्स होते, तर यूट्युबवर तब्बल १० लाखांपेक्षा अधिक सबस्क्राइबर्स आहेत.

हिंदुस्तानी भाऊ म्हणजे विकास जयराम पाठक हा जन्माने मुंबईकर आहे. तो आई-वडील, पत्नी आणि मुलगा आदित्य यांच्यासह मुंबईत राहतो. पुलवामा हल्ल्यानंतर भारताविषयी बोलणाऱ्यांना चपराक लगावण्यासाठी त्याने सहजच एक व्हिडीओ बनवला होता. या व्हिडीओला चांगले हिट्स मिळाले. विकासचे 'हिंदुस्तानी भाऊ' असे नामकरण झाले. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

टॅग्स :नवाब मलिकअमली पदार्थ