मुंबई : मी पुन्हा येईन, याच भूमिकेत, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी... अशा सूचक काव्यपंक्ती उच्चारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विद्यमान सरकारच्या काळातील शेवटच्या विधिमंडळ अधिवेशनातील आजच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून परतेल, असा दृढ विश्वास व्यक्त केला.
अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून काम करताना पाच वर्षांच्या काळात अनेक अडचणी, आव्हाने आली. त्यापासून मी पळालो नाही. सर्वांना सोबत घेवून, प्रामाणिकपणे आणि सकारात्मकतेने प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले. गेल्या १५-२० वर्षांत न झालेल्या गोष्टी करून दाखविल्या. महाराष्ट्राचे वैभव परत आणण्यात यशस्वी ठरलो. आज महाराष्ट्र सर्वच आघाड्यांवर क्रमांक एकचे राज्य आहे.
मुख्यमंत्र्यांचे आजचे भाषण एकप्रकारे या कार्यकाळातील समारोपाचे भाषण होते. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवत, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या मार्गावर चालत, शाहू महाराज, महात्मा फुलेंच्या विचारांचा वारसा घेवून, दीनदयालजींच्या अंत्योदयाचा विचार घेवून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यकारभाराचा आदर्श ठेवत पाच वर्षे मी काम केले. वारीत जसे आपण सहभागी होतो तसा या राज्यकारभाराच्या वारीत सहभागी झालो. यामुळेच पांडुरंगाचा आशीर्वाद लाभला.
चंद्रकांतदादांची पाठराखण : मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांना मोबाइल देण्याच्या योजनेत घोटाळा नसल्याचे सांगत महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांची पाठराखण केली. तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना मी३० वर्षे ओळखतो, ते दुर्भावनेने कधीही काहीही करत नाहीत. त्यांच्याकडून निराश होऊन कुणीही परतत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पाठराखण केली.