Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीदींच्या १०० व्या वाढदिवशीदेखील मीच असणार मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 06:00 IST

दीदींचा १०० वा वाढदिवस मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची इच्छा फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

मुंबई : लतादीदींच्या ९०व्या जन्मदिनाच्या निमित्ताने असा ऐतिहासिक ग्रंथ प्रकाशित करतोय. या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याची संधी मिळाली, या क्षणाचे साक्षीदार होणे म्हणजे इतिहासात आपली नोंद करून घेण्यासारखे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दीदींचा १०० वा वाढदिवस मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची इच्छा फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त ‘लता ९०’ हा विशेष कार्यक्रम रवींद्र नाट्य मंदिर येथे शनिवारी पार पडला. लतादीदींवरील ‘लता’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, लतादीदींच्या भावना एका ग्रंथात समाविष्ट करणे कठीण आहे, इतकी वर्षे सातत्याने विश्वाला मोहिनी घालण्याचे काम त्यांनी केले. अनेक शब्दांची अभिव्यक्ती लतादीदींच्या गाण्यातून समजते. पुढच्या अनेक पिढ्यांना लतादीदींचा आवाज ऐकायला मिळावा ही कामना व्यक्त करतो.या सोहळ्याला सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार, अभिनेत्री सुलोचनादीदी, अभिनेता जॅकी श्रॉफ, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, गायक सुरेश वाडकर, गायिका उत्तरा केळकर, संगीतकार आनंदजी, अभिनेते सुमित राघवन आणि व्हॅल्युएबल ग्रुपचे अमेय थेटे आदी उपस्थित होते. या वेळी अभिनेता सुमित राघवन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लतादीदींना दिलेल्या शुभेच्छांचे वाचन केले.हृदयनाथ मंगेशकर यांनी मनोगतात म्हटले की, ५० वर्षांपूर्वी हे पुस्तक प्रकाशित केले होते. आता या पुस्तकाचे पुनर्मुद्रणही सुंदर केले आहे. तर शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी लतादीदींच्या उदंड आयुष्याची कामना करीत एका पुस्तकात त्यांचे आयुष्य मावणे कठीण असल्याचे म्हटले. त्यांच्या आवाजातून आईची आठवण येते. जोवर विश्व आहे तोवर लतादीदींचा आवाज असेल, अशी कृतज्ञ भावना त्यांनी व्यक्त केली.लतादीदींचा वाढदिवस घरी साधेपणाने साजरा करण्यात आला. त्यांच्या नव्वदीनिमित्त पार पडलेल्या कार्यक्रमात दीदी उपस्थित राहू शकल्या नाहीत मात्र वेळोवेळी त्यांच्या भावना हृदयनाथ मंगेशकर यांनी रसिकांपर्यंत पोहोचविल्या. लतादीदींनी मला प्रतिनिधी म्हणून पाठविले आहे, असा उल्लेख करीत हृदयनाथ मंगेशकर यांनी रसिकांचे यावेळी आभारही मानले. तर, पं. हरिप्रसाद चौरसिया, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर अशा कला-सिनेमा, क्रीडा, संगीत क्षेत्रातील विविध मान्यवरांनी वेगवेगळ््या संदेश व्हीडीओ आणि पोस्ट्स शेअर करत लता दीदींना शुभेच्छा दिल्या. याखेरीज, सामान्य नागरिकांनीही लता दीदींचे फोटो, गाण्यांचे व्हीडीओ पोस्ट्स करीत दीदींच्या उदंड आयुष्याच्या मनोकामना केल्या.हजारो वर्षेआवाज राहीललतादीदींविषयी सर्व जग बोलत आहे, त्यामुळे मी काही वेगळं बोलायची गरज नाही. पण, लतादीदींचा आवाज हजारो वर्षे तसाच राहील, ही इच्छा व्यक्त करते.- सुलोचनादीदी, ज्येष्ठ अभिनेत्री

टॅग्स :लता मंगेशकरदेवेंद्र फडणवीस