Join us  

"योजनेला बाळासाहेबांचं नाव द्या म्हणून 14 पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवली, पण"; गुवाहटीतील आमदाराचा व्हायरल कॉल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 1:28 PM

आमदार शहाजी पाटील यांनी गणपतराव देशमुख यांच्या आठवणी सांगत महाविकास आघाडीतील मंत्र्यांविरुद्ध नाराजी व्यक्त केली

मुंबई - राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या 4 दिवसांपासून सातत्याने राजकीय घडामोडींतून भूकंपाचे धक्के बसत आहेत. आमदार संजय शिरसाट यांच्या पत्रानंतर गुवाहटीत असलेल्या सांगोल्यातील आमदार शहाजी पाटील यांचा एका कार्यकर्त्याशी झालेला फोनसंवाद सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या कॉलमध्ये शहाजी पाटील यांनी शिंदेंसोबत जाण्याची आपली मजबुरी आणि भविष्यातील फडणवीस सरकारचे भाकितही केलं आहे. त्यात, उद्धव ठाकरेंना देवमाणूस म्हणतानाच त्यांच्याकडून काम होत नव्हती असेही ते म्हणाले. यावेळी, राष्ट्रवादीवर गंभीर आरोपही त्यांनी केले आहेत. 

आमदार शहाजी पाटील यांनी गणपतराव देशमुख यांच्या आठवणी सांगत महाविकास आघाडीतील मंत्र्यांविरुद्ध नाराजी व्यक्त केली. तर, एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या आपुलकीची आणि कामांची उदाहरणेही सांगितली. याचवेळी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत, अजित पवारांसोबत आपलं जमत नसल्याचंही ते म्हणाले. अडीच वर्षांत आमच्या आमदारक्या राष्ट्रवादी कॉंग्रेस खातंय, उद्या भांडण झालं तर राष्ट्रवादी आमचे मतदारसंघ हाणतंय. आम्ही मोकळं राहतोय हीच भावना प्रत्येकाचीय, असेही ते म्हणआले. 

उद्धव ठाकरेंबद्दल एकाही आमदाराच्या मनात राग नाही, पण आपली कामचं होत नव्हती. तालुक्याच्या विकासकामाला हातभारच लागत नव्हता. आपण, सांगोला उपसा सिंचन योजनेला हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली, त्याला काय पैसे लागतात व्हय. पण, तेही झालं नाही. अडीच वर्षे झाली.याला काय पैसे हाय का फंड हाय काय ओ, नुसतं सांगोला उपसा सिंचन योजना याला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन हे नाव द्या, तेरा - चौदा पत्रं मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवली. जयंत पाटील साहेबांच्या कार्यालयाला पाठवले. कोणी त्याचा विचार करेना, अशी कैफियतच आमदार पाटील यांनी कार्यकर्त्याशी बोलताना मांडली होती. 

कार्यकर्ता आणि आमदार पाटील यांच्यातील संवाद

कार्यकर्ता : नेते, नमस्कार

शहाजी पाटील : नमस्कार नमस्कार

कार्यकर्ता : आहो नेते कुठायं. तीन दिवस झालं फोन लावतोय, फोनच लागत नाही.

शहाजी पाटील : मी सध्या गुहावाहाटीमध्ये आहे.

कार्यकर्ता : बरं...हितं आम्ही टीव्हीवरच आम्ही बघतोय, तुमचा कसलाच कॉन्टॅक्ट नाय, पण एवढं घटनाक्रम तुम्ही जरा बोलायंच तर थोडतरी सांगायचं...शहाजी पाटील : नाय नाय नाय हॅलो...नेत्यांचा आदेश होता. कोणाला फोन करू नका, पण आता ४१ झालं म्हणल्यावर मलाबी करमना म्हटलं तालुक्यात कुणाला तर बोलू. काय चाललंय, काय नाही. बरं पहिलसारखा तालुका कसा हाय?

कार्यकर्ता : सगळं ओके आहे, तुम्ही घेतलेल्या भूमिकेच स्वागत केलं आहे.

शहाजी पाटील : आरे वा वा बर ठीक हाय ठीक हाय...

कार्यकर्ता : पण सर्वांना तुमचा निर्णय महत्त्वाचा आवडलायं...शहाजी पाटील : आरे वा, हॅलो रफीकभाय आता तुम्हाला मी बोलो न्हाय? माणूस बोलत नाही; पण रिझल्ट इतक करेक्ट हाय त्या माणसाचां मलाही वर्षभर नेतृत्व लय आवडलं होतं.कार्यकर्ता : बरं... बरं पण ते आपल्याला रिस्पेक्टपण भरपूर देत होतं. आपण प्रत्येकवेळी भेटायला गेल्यावर...

शहाजी पाटील : च्यायला काय आपली वळक नाही पाळक नाही, पण त्या माणसानं आल्या आल्या तुम्ही गणपतरावच्या मतदारसंघातून निवडून आलायं. काय बी अडचण सांगा म्हणाले.

कार्यकर्ता : तुम्ही दोघे पहिल्यांदा गेलात का?शहाजी पाटील : पहिल्यांदा इंट्री आमच्या दोघांची झाली, ही लढाई शंभर टक्के जिंकणार. कसाय हे घडतं कशासाठी उद्धव साहेबांना कोणाचाच विरोध नाही. त्यांना प्रत्येक आमदार हा आतासुद्धा देवमाणूस मानतोय देव. माझ्यासहीत सगळ्यांच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल एवढा आदर हाय. अडीच वर्षांत आमच्या आमदारक्या राष्ट्रवादी कॉंग्रेस खातंय, उद्या भांडण झालं तर राष्ट्रवादी आमचे मतदारसंघ हाणतंय. आम्ही मोकळ राहतोय हीच भावना प्रत्येकाचीय.

कार्यकर्ता : ते आलेत का गोळा किती झालेत? टीव्हीवर कधी ४६, तर काल ४० चा आकडा दाखवतंय...

शहाजी पाटील : शिवसेनेचे जवळ जवळ ४१ झालेत, अजू्न दोघे तिघे वाटेवर आहेत ४५ होतील. अपक्ष एक ७ ते ८ हाेतील. अडीच वर्षे तुम्हाला सांगतो तुमची जवाबदारी काय तालुक्याचा विकास होईल फक्त बघत राहावा. ऐतिहासिक विकास आपल्या तालुक्याचा होणार. इतिहासाला याची नोंद घ्यावी लागणार.

कार्यकर्ता : आता सुद्धा तुम्ही भरपूर काम केलंय, पण अजू्न बरीच कामं शिल्लक आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्याचं अजून तसंच राहिलं

शहाजी पाटील : अडीच वर्षे झाली.याला काय पैसे हाय का फंड हाय काय ओ, नुसतं सांगोला उपसा सिंचन योजना याला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन हे नाव द्या, तेरा - चौदा पत्रं मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवली. जयंत पाटील साहेबांच्या कार्यालयाला पाठवले. कोणी त्याचा विचार करेना.

कार्यकर्ता : तुम्ही परवा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बोलला होतात ना? मागं बोललात ना दोन महिन्यांपूर्वी...

शहाजी पाटील : स्पष्ट बोलो ना, याला काय खर्च येतंय का? बरं दोन महिने झाले बैठक हाेऊन आता तरी निर्णय कुठाय? बरं त्या बैठकीत आपण सगळे मुद्दे मांडले, साहेबांनी ऐकून घेतले. रिझल्ट कुठाय?

कार्यकर्ता : परवा सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रं जी मागितली ते पैसे मिळाले आणि मुख्यमंत्री साहेबांना नगरपालिकेच्या इमारतीसाठी पैसे मागितले.

शहाजी पाटील : इमारात १२ कोटी, काय सुद्धा नाय ओ फक्त तपासून अहवाल सादर करावा. ते घारगे लिहतंय अन् साहेब खाली सही करतंय. साहेबांची अशी ऑर्डर कुठं आहे. तातडीने अंमलबजावणी करावी, खाली उद्धव ठाकरे, धुरळा काढला असता आपण मतदारसंघाचा आतापर्यंत.

कार्यकर्ता : आता कधी घडणार हे सगळं कसं घडणार?

शहाजी पाटील : आता साहेब निर्णय घेणार, साहेबांच्या मनावर हाय. एक सांगतो सरकार १०० टक्के झालं फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री चांगली संख्या मंत्रिपदाची एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाला मिळणार.

कार्यकर्ता : आपल्याला काय?

शहाजी पाटील : काय आपल्याला दिलं दिलं,नाय नाय, फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री म्हणजे आपणच उपमुख्यमंत्री हाे. फडणवीस अन् आपलं नातं भावा-भावासारखं आहे. एकनाथ शिंदे मला मुलासारखं बघतंय, लयच प्रेमळ नजर हाय त्या माणसाची माझ्यावर हाय... 

टॅग्स :सांगोलाशिवसेनाउद्धव ठाकरेगौहती