मला मिळालेल्या संधीचे मी सोने केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:13 IST2021-01-13T04:13:04+5:302021-01-13T04:13:04+5:30
आकांक्षा सोनावणे : हा माझा नव्हे तर एअर इंडियाचा विजय लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वैमानिक म्हणून अनेकांनी अनेक४ ...

मला मिळालेल्या संधीचे मी सोने केले
आकांक्षा सोनावणे : हा माझा नव्हे तर एअर इंडियाचा विजय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वैमानिक म्हणून अनेकांनी अनेक४ स्वप्न पाहिलेली असतात. कधी ती पूर्ण होतात, तर कधी अर्धवटच राहतात. स्वप्न न पाहताही मिळालेल्या संधीचे सोने करणारे फार कमी असतात. या यादीत आता आणखी एक नाव जोडले गेले आहे ते म्हणजे एअर इंडियाच्या महिला वैमानिक कॅ. आकांक्षा सोनावणे यांचे. मला मिळालेल्या संधीचे मी साेने केले, हा माझा नव्हे तर एअर इंडियाचा विजय आहे, असे साेनावणे यांनी सांगितले.
एअर इंडियाच्या महिला विमानचालकांनी विक्रम रचला आहे. त्यांनी बोईंग-७७७ एसएफओ-बीएलआर या विमानातून उत्तर ध्रुवावरून उड्डाण करून जगातील सर्वांत जास्त लांबीचा म्हणजे १६ हजार किमीचा सॅन फ्रॅन्सिस्को ते बंगळुरू हवाई प्रवास केला. हे विमान सोमवारी पहाटे बंगळुरू येथे दाखल झाले असून, या विमानाच्या वैमानिक आकांक्षा सोमवारी सकाळी आपल्या वांद्रे येथील घरी दाखल झाल्या. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक होत असतानाच आकांक्षा यांच्या आई प्रभा यांनीही त्यांच्या मुलीचे अनुभव सांगत प्रतिक्रिया दिली.
तर, वैमानिक महिला असो किंवा पुरुष; काम हे काम असते. मी असे काही स्वप्न पाहिले नव्हते. मात्र माझ्या कामावर माझ्या कंपनीने विश्वास ठेवला हे मी माझे भाग्य समजते. त्यांनी मला जी संधी दिली, तिचे मला सोने करता आले यातच सारे काही आले. या घटनेची ऐतिहासिक नोंद झाली आहे आणि त्याचा मी एक भाग आहे याचा आनंद आहे. अभिमान आहे. गर्व आहे, अशी प्रतिक्रिया कॅ. आकांक्षा सोनावणे यांनी दिल्याचे आकांक्षा यांच्या आई प्रभा सोनावणे यांनी सांगितले. आजच्या प्रवासाची त्यांच्या कामात एक वेगळी आणि ऐतिहासिक नोंद झाल्याने उत्साही आहे, असेही त्यांनी सांगितले.
* उत्तर ध्रुवावरून विमान उडविणे आव्हानात्मक
महिला वैमानिकांच्या टीमने उत्तर ध्रुवावरून उड्डाण करण्याची पहिलीच वेळ होती. उत्तर ध्रुवावरून विमान उडविणे आव्हानात्मक असल्याने हवाई वाहतूक कंपन्या या मार्गाची जबाबदारी अनुभवी वैमानिकांकडे देतात. एअर इंडियाने ही जबाबदारी महिला कॅप्टनकडे दिली. ९ जानेवारीला सॅन फ्रान्सिस्कोवरून उड्डाण केलेले हे विमान उत्तर ध्रुवावरून झेपावत बंगळुरूत ११ जानेवारी रोजी उतरले.
....................................................