लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्ला प्रकरणात संशयित म्हणून ताब्यात घेतल्यामुळे नोकरीबरोबरच ठरलेले लग्नही मोडल्याचा आरोप आकाश कनोजियाने केला आहे. याची भरपाई कोण देणार, असा सवालही त्याने उपस्थित केला आहे.
कुलाबा परिसरात राहणारा आकाश कनोजिया पश्चिम रेल्वेच्या कंत्राटी वाहनावर कारचालक म्हणून नोकरीला होता. १७ तारखेला तो होणाऱ्या नवरीला भेटण्यासाठी ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसने मुंबईहून बिलासपूरला निघाला असताना दुर्ग स्थानकातील आरपीएफने त्याला पकडले.
हल्लेखोर टॅग लागल्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले!कनोजियाच्या आरोपानुसर, १७ जानेवारी रोजी त्याला पोलिसांचा कॉल आला. त्यांनी कुठे आहे, असे विचारले. त्यांना घरी असल्याचे सांगताच त्यांनी कॉल कट केला. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसने जात असताना रायपूरपर्यंत पोहोचताच त्याला आरपीएफने ताब्यात घेतले. आरपीएफ पोलिसांनी केवळ पकडलेच नाही तर त्याचा फोटो आणि नावासहित प्रेसनोटही पाठवली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात माध्यमांवर फोटो झळकले. सोशल मीडियावरही फोटो व्हायरल झाले. त्यानंतर १२ तासाने पोहोचलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले. मी पोलिसांना काहीही केले नाही. मला सोडा असे वारंवार सांगत होतो. माझ्या घराबाहेरील परिसरातील सीसीटीव्हीही तपासण्यास सांगितले. मात्र, कोणीही माझे म्हणणे ऐकले नाही. १९ तारखेला सकाळी मला सोडण्यात आले. तसेच आजारी असलेल्या आजीकडे जाण्याचीही परवानगी दिली. या प्रकारानंतर आईशी बोलताच तीदेखील खूप घाबरली होती. काम करत असलेल्या ठिकाणाहूनही काम थांबविण्याबाबत सांगितले. मुलीच्या कुटुंबीयांनीही कनोजियाचे स्थळ नाकारले. बऱ्याच वर्षांनी आमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होणार होते. मात्र मात्र सैफ अली खानचा हल्लेखोर हा टॅग लागल्याने या प्रकरणामुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले, अशी खंत कनोजियाने व्यक्त केली आहे.