मी राज्य पाहतो, तुम्ही गड सांभाळा!
By Admin | Updated: September 27, 2014 00:11 IST2014-09-27T00:08:06+5:302014-09-27T00:11:31+5:30
पतंगराव कदम : शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल; कडेगावात विराट सभा

मी राज्य पाहतो, तुम्ही गड सांभाळा!
कडेगाव : कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामांची माहिती जनतेला आहे. माझ्यावर राज्याची जबाबदारी आहे. पक्षाचा ज्येष्ठ नेता म्हणून मला राज्यभर प्रचार दौरे करावे लागणार आहेत. तुम्ही गड सांभाळा, मी राज्याचे पाहतो, असे प्रतिपादन डॉ. पतंगराव कदम यांनी येथे केले.
कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून डॉ. कदम यांनी कडेगाव येथील तहसील कार्यालयात आज (शुक्रवार) निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर येथील मोहरम चौकात झालेल्या सभेत डॉ. कदम बोलत होते.
मी वारंवार सांगत होतो की, शरद पवार देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असणारे नेते आहेत. त्यांना छोटे करू नका. यावर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची बडबड सुरू झाली, अशी टीका त्यांनी सुनील तटकरे यांचे नाव न घेता केली.
ते म्हणाले की, दुष्काळ, अतिवृष्टी अशा आपत्तीच्या वेळी मी मदत व पुनर्वसनमंत्री म्हणून निर्णय घेत राज्यात १२ हजार कोटी रुपयांची मदत दिली. माळीण दुर्घटनेतही मदतकार्य केले. भाजप-शिवसेना युती तुटली. राष्ट्रवादीने आमच्याशी फारकत घेतली. परंतु शाहू, फुले, आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांचा महाराष्ट्र काँग्रेसची साथ सोडणार नाही.
यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम म्हणाले की, राज्यातील २८८ मतदारसंघांपैकी सर्वाधिक ५७५ कोटींची विकासकामे याच मतदारसंघात झाली आहेत. विरोधकांनी सहकारी तत्त्वावरील कारखाना खासगी केला. भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या व्यक्तीवर हल्ला केला आणि हेच विरोधक आता सुसंस्कृतपणावर भाषणे देत
आहेत.
यावेळी सरपंच विजय शिंदे, मालन मोहिते, श्वेता बिरनाळे, श्रीकांत लाड, रंगराव महाडिक, अॅड. ए. बी. मदने, सत्यजित यादव-देशमुख, भीमराव मोहिते, डॉ. पृथ्वीराज चव्हाण, डॉ. जितेश कदम यांची भाषणे झाली. (वार्ताहर)
कडेगावला मोहरम यात्रेचे स्वरूप
डॉ. पतंगराव कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना तरुणांनी भव्य दुचाकी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. यावेळी कडेगावसह परिसराला जणू मोहरम यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. कडेगाव येथील मुस्लिम समाजातील तरुणांनी मोहनराव कदम यांच्यासमवेत शक्तिप्रदर्शन केले.