Join us
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षे झाली किडनीच मिळत नाही..! तहान लागली, तरी अतिरिक्त पाणी पिता येत नाही...; किडनीविकाराने त्रस्त रुग्णाने मांडली व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2022 10:35 IST

Human organ: सगळं काही सुरळीत होतं. पाहिजे ते खायचो, व्यायाम करायचो, मुलांसोबत सुटीच्या वेळी फिरायला बाहेर जायचो; पण अचानक किडनीचा त्रास सुरू झाला आणि डॉक्टर म्हणाले की, दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत.

- संतोष आंधळे मुंबई : सगळं काही सुरळीत होतं. पाहिजे ते खायचो, व्यायाम करायचो, मुलांसोबत सुटीच्या वेळी फिरायला बाहेर जायचो; पण अचानक किडनीचा त्रास सुरू झाला आणि डॉक्टर म्हणाले की, दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. त्यानंतर आठवड्यातून तीन दिवस डायलिसिस सुरू झाले. आता दिवसाला केवळ ८०० मिलिलिटर ते एक लिटर इतकंच  पाणी पिऊ शकतो. कितीही तहान लागली तरी अतिरिक्त पाणी पिता  येत नाही. अळणी जेवण जेवावं  लागतं. ही प्रातिनिधिक कैफियत आहे ४३ वर्षीय राकेश जैन यांची. गेली चार वर्षे किडनी विकारापासून ते त्रस्त असून, किडनी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

अवयवांसाठी राेजचा संघर्ष कांदिवली येथे प्लायवूड विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या जैन यांना २०१७ ला किडनीचा त्रास जाणवला. उपचाराकरिता जैन यांनी किडनी विकार तज्ज्ञांची मुंबईतील रुग्णालयात भेट घेतली. काही रक्ताच्या तपासण्या केल्यानंतर जैन यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे डॉक्टरांनी निदान केले. त्यावर उपचाराचा भाग म्हणून डॉक्टरांनी त्यांना आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस सुरू करून किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. घरातील नातेवाइकांमध्ये कुणाचा रक्तगट जुळत नसल्याने घरच्यांकडून किडनी  मिळण्याच्या आशा मावळल्यानंतर, जैन यांनी त्यांचे नाव रुग्णालयामार्फत मुंबई विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती यांच्याकडील मूत्रपिंडाच्या प्रतीक्षा यादीत नोंदविले आहे.राज्यात ५,६०२  रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेतकेंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचे मुंबई येथील केईएम रुग्णालयात, राज्य अवयव आणि उती पेशी प्रत्यारोपण संस्था यांचे कार्यालय असून (स्टेट ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन : सोटो),  राज्यातील अवयवदान नियमनाच्या प्रक्रियेवर त्यांचे लक्ष असते. या संस्थेच्या आकडेवारीनुसार मे २०२२ पर्यंत राज्यात ५,६०२ रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत.

या रुग्णांमध्ये शक्यतो उच्च आणि कमी रक्तदाबाच्या तक्रारी असतात. क्रियाटनीनची पातळी वाढल्यामुळे त्यांना औषध देऊन उपचार केले जातात. रुग्णांच्या खाण्यापिण्यावर मोठे निर्बंध असतात. किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आपल्याकडे यशस्वी होत आहे. मात्र, त्या मिळायला हव्या.- डॉ. जतीन कोठारी, किडनी विकार विभाग प्रमुख, मॅक्स नानावटी रुग्णालयडायलिसिसला जावे लागते. तो दिवस प्रचंड थकवणारा असतो. त्यानंतर कोणतंही काम करण्याची इच्छा उरत नाही. सर्वच गोष्टींवर निर्बंध असलेलं जीवन जगताना किडनी कधी मिळेल याचाच रोज विचार सुरू असतो. प्रतीक्षा यादी खूप मोठी आहे, त्यामुळे अवयव मिळण्याच्या प्रतीक्षेत दिवस घालवावा लागत आहे. - राकेश जैन, रुग्ण

टॅग्स :अवयव दानआरोग्यमुंबई