..तर अभ्यंकर वाचले असते
By Admin | Updated: November 14, 2014 12:15 IST2014-11-14T01:55:24+5:302014-11-14T12:15:56+5:30
‘जय मल्हार’ मालिकेत प्रधानजी ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते अतुल अभ्यंकर खरोखरच दुर्दैवी ठरले. मध्यरात्री दोन वाजता त्यांच्या छातीत दुखू लागले.

..तर अभ्यंकर वाचले असते
मनीष म्हात्रे, मुंबई
‘जय मल्हार’ मालिकेत प्रधानजी ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते अतुल अभ्यंकर खरोखरच दुर्दैवी ठरले. मध्यरात्री दोन वाजता त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी सोबतच्या नातेवाईक महिलेने तब्बल एक तास धडपड केली. इमारतीतल्या शेजा:यांचे दरवाजे ठोठावले. अगदी इमारतीच्या सुरक्षारक्षकाकडे मदतीसाठी पदर पसरला. मात्र कोणीही त्यांच्या मदतीला धावून आले नाही. या गडबडीत तब्बल एक तास वाया गेला. जेव्हा मदत मिळाली तोवर मात्र खूप उशीर झाला होता.
नवघर पोलिसांनी अभ्यंकर यांच्या अपघाती मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली. या प्रक्रियेत त्यांनी अभ्यंकर यांच्यासोबत घरी असलेल्या नातेवाईक महिलेचा जबाब नोंदवून घेतला. या जबाबात मंगळवारी मध्यरात्री दोन ते तीन या एका तासात घडलेला थरार नोंद झाला आहे.
पुण्यावरून शूटिंग आटोपून अभ्यंकर नवघरच्या टाटा कॉलनी, रिवाईज इमारतीत आपल्या काकांच्या रिकाम्या फ्लॅटमध्ये आले. मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी सोबतच्या नातेवाईक महिलेला मदतीची गरज होती. म्हणून ही महिला घराबाहेर पडली. संपूर्ण इमारतीतल्या फ्लॅटचे दरवाजे तिने मदतीसाठी ठोठावले. सुरक्षारक्षकालाही तिने मदतीचे आवाहन केले. मात्र कोणीच अभ्यंकर यांच्या मदतीला आले नाही. या गडबडीत अभ्यंकर असलेल्या फ्लॅटचा दरवाजा बंद झाला आणि ही महिला बाहेर राहिली. त्यामुळे गोंधळ आणखी वाढला. अखेर या महिलेने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घडलेली हकीगत सांगितली. पुढल्या पाच मिनिटांत अग्निशमन दल, नवघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी क्षणाचाही विलंब न करता घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा अभ्यंकर बेशुद्धावस्थेत आढळले. लागलीच त्यांना पालिकेच्या वीर सावरकर रुग्णालयात दाखल केले गेले. तेथील डॉक्टरांनी अभ्यंकर यांना मृत घोषित केले.