Shiv Sena Aditya Thackeray: "आपल्या मुंबईत गेल्या दोन वर्षांपासून जिथे तिथे रस्त्यांची कामं सुरू आहेत, रस्ते बंद आहेत, धुळीचं साम्राज्य आहे. पण त्यापेक्षा भयंकर म्हणजे सरसकट काँक्रिटीकरणाच्या नावाखाली मुंबईकरांची तिजोरी रिकामी करण्याचा हा महाघोटाळा सुरु आहे. ज्यावर मी सातत्याने आवाज उठवत आलोय. आज पुन्हा एकदा मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ह्या घोट्याळ्याची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आणि त्यात जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली," अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्सद्वारे दिली आहे.
"मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा आम्ही असा वाया जाऊ देणार नाही, मुंबईची होत असलेली वाताहत आम्ही थांबवल्याशिवाय राहणार नाही," असंही आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, "मी आपणास बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सन २०२३-२०२४ या कालावधीत मुंबईतील सिमेंट रस्ता काँक्रिटीकरणातील घोटाळ्याबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. सन २०२३-२०२४ या कालावधीतील सिमेंट रस्ता काँक्रिटीकरणाच्या टेंडर प्रक्रियेवर अनेक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी घोटाळ्याचा आरोप केला आहे. शुक्रवारी, दि. २१ मार्च रोजी सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या अनेक आमदारांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. आपणास माहीतच आहे की, मुंबईतील सर्व रस्ते एकतर खोदून ठेवलेले आहेत किंवा अर्धवट कामामुळे वाहतुकीची अडचण करून ठेवलेली आहे. तरी २०२३-२०२४ या कालावधीत सुरू झालेल्या मुंबईतील या सर्व रस्त्यांच्या कामाची आणि त्यातील टेंडर प्रक्रियेमधील घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी इओडब्ल्यूतर्फे लवकरात लवकर चौकशी सुरू करून सदर प्रकरणात सहभागी असलेल्या कॉन्ट्रॅक्टर, अधिकारी व इतर दोषी व्यक्तींवर लवकरात लवकर कारवाई केली जावी," अशी मागणी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.