Join us

मी त्याचा खेळ संपवला, त्याला झोपवून आलोय!, दांड्याने मारहाण करून पिल्लाचा घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 02:32 IST

तक्रारदार पायल गुंड (४४) या बोरीवली पश्चिमेच्या शिवाजीनगर परिसरात राहतात.

मुंबई : सहा महिन्यांच्या श्वानाच्या पिल्लाला लाकडी दांड्याने मारहाण करत तिचा जीव घेण्याचा अमानुष प्रकार एमएचबी कॉलनी पोलिसांच्या हद्दीत घडला. या प्रकरणी पोलिसांनी नीरज निशाद नावाच्या मारेकऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याने मैने उसका गेम खतम कर दिया, उसको सुलाके आया, असे स्वतः स्थानिकांकडे कबूल केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

तक्रारदार पायल गुंड (४४) या बोरीवली पश्चिमेच्या शिवाजीनगर परिसरात राहतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरासमोर गेल्या पाच ते सहा वर्षांपासून एक पांढऱ्या रंगाची मादी जातीची कुत्री बसत होती. गुंड यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना तिचा लळा लागला होता. त्यामुळे गुंड तिला रोज जेवण द्यायचे. दरम्यान, २५ ऑगस्ट रोजी दुपारी काही कामानिमित्त त्या बाहेर गेल्या होत्या त्यावेळी त्यांना त्यांच्या मुलीने फोन करून घराबाहेर बसलेल्या कुत्रीला कोणीतरी दांड्याने मारले, असे सांगितले.

ते ऐकल्यावर गुंड या तातडीने घरी यायला निघाल्या. तेव्हा त्यांना त्यांच्या ओळखीचा उमेश विश्वकर्मा (३३) या शेजाऱ्याने फोन केला आणि  त्याला निशाद भेटला होता, त्याने ‘मैने उसका गेम खतम कर दिया, उसको सुलाके आया’ असे बोलल्याचे सांगितले. नंतर विश्वकर्मा गुंड यांच्या घराजवळ गेला त्यावेळी त्याला पांढऱ्या रंगाची कुत्री रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. ते ऐकल्यावर गुंड यांना धक्काच बसला आणि त्यांनी एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी निशाद नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :मुंबई