Join us  

"माझं लग्न नाय, लफडं नाय, कुठं भानगड नाय"; परभणीकरांना जानकरांचे 'एअरपोर्ट' आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 9:09 PM

माझं कुठं कॉलेज नाय, शाळा नाय, भानगड नाय, लग्न नाय, लफडं नाय, आपला हा देह तुमच्यासाठीच आहे, असे म्हणत महादेव जानकरांनी परभणीकरांना मनातून साद घातली.

मुंबई/परभणी - राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री महादेव जानकर यांना महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज महादेव जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी, आयोजित सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महादेव जानकरांचं कौतुक केलं. महादेव जानकर हे गावाकडं एखाद्या खोपट्यात बसू शकतात, तेथेच झोपू शकतात आणि सकाळी तिथंच आवरुन आपल्या कामाला निघू शकतात, असा सर्वसामान्य माणूस तुमचा उमेदवार आहे. त्यामुळे, या उमेदवाराच्या पाठिशी ताकद देऊन उभे राहा, असे अजित पवार यांनी म्हटले. तर, माझं लग्न झालं नाही, मला घर-दार नाही, त्यामुळे मी तुमच्यासाठीच आहे, असे म्हणत परभणीकरांना साद घातली. 

माझं कुठं कॉलेज नाय, शाळा नाय, भानगड नाय, लग्न नाय, लफडं नाय, आपला हा देह तुमच्यासाठीच आहे, असे म्हणत महादेव जानकरांनी परभणीकरांना मनातून साद घातली. तसेच, गत लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांनाही महादेव जानकरांनी शब्द दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने मी शब्द देतो, राजेश विटेकर अजित दादा तुला खाली ठेवणार नाहीत, असेही जानकर यांनी म्हटले. 

मी खासदार झाल्यावरही तुम्हाला विचारल्याशिवाय सही करणार नाही. कारण, मला बायका-पोरं नाहीत, घर नाही, दार नाही. मी रेल्वे स्टेशनवरसुद्धा झोपू शकतो. जसा नागपूरचा विकास आहे, जसा बारामतीचा विकास आहे, तसा परभणीचा विकास केल्याशिवाय महादेव जानकर शांत बसणार नाही. मीही एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे, मी इतर राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांकडे परभणीच्या विकासासाठी माझी झोळी पसरवेल. मी आता परभणीत घर घेतोय, इथंच एक बंगला घेऊन राहतो, असे जानकर यांनी म्हटले. 

परभणीत आपण एअरपोर्ट आणू

मला इंग्रजी येतं, मला १७ भाषा येतात, खासदारकीच्या ठिकाणी इंग्रजी आणि हिंदी चांगलं लागतं, ते मला चांगलं येतं. परभणीच्या विकासाचं रोल मॉडेल आपण बनवू, एअरपोर्ट आणण्याचा प्रयत्न करू, रेल्वेच्या बोगींगचा प्रयत्न करू, समृद्धी महामार्गाला हा जिल्हा जोडण्याचा प्रयत्न करू, मी या नेत्यांना विनंती करेल की, आम्हाला स्टार एमआयडीसी द्या, विकासाची गंगा आणण्यासाठी मी प्रयत्न करेन. माझं कुठं कॉलेज नाय, शाळा नाय, भानगड नाय, लग्न नाय, लफडं नाय, आपला हा देह तुमच्यासाठीच आहे, असे म्हणत महादेव जानकरांनी परभणीकरांना मनातून साद घातली.  

टॅग्स :लोकसभामहादेव जानकरभाजपापरभणीनिवडणूक