Join us

संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 06:00 IST

मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांचा सोमवारी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘फिनिक्स’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

मुंबई : संयम आणि सकारात्मकता या दोनच गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आजवरच्या राजकीय प्रवासाचे गुपित उलगडले. भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगले आहे, हे बघण्याचा माझा सातत्याने प्रयत्न असतो, असेही ते म्हणाले. 

मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांचा सोमवारी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘फिनिक्स’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री म्हणाले की, आव्हानांपासून मी कधी पळालो नाही, त्यांचा सामना केला. कधी कुणाचा द्वेष केला नाही, माणसे झुंजवली नाहीत, टोकाचे राजकारण केले नाही. त्यामुळेच विपरीत परिस्थितीत एक-एक पाऊल पुढे टाकत गेलो. अनेक पिढ्यांच्या कामी येतील अशा मी केलेल्या २५ गोष्टी तरी मला सांगता येतील. सकारात्मकता ठेवून काम केल्यानेच हे शक्य झाले. 

पत्रकार आणि राजकारणी हे लोकशाहीच्या गाड्याची दोन चाके आहेत. ही दोन चाके एकमेकांसोबत चालली तरच लोकशाही योग्य रुळावर राहते. टीका करणे हा पत्रकारांचा अधिकार आहे, पण त्याच वेळी आमची बाजूही ऐकून घ्यावी. लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी पत्रकारितेचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. हा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभमजबूत राहावा म्हणून सरकारकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.

श्री श्री रविशंकर म्हणाले, संत आणि पत्रकारांकडून प्रशंसा ऐकणे सोपे नाही, खास करून ज्यांच्यावर जबाबदारी असते त्यांना फुलंही मिळतात आणि दगडही, पण आपण ते कसे घ्यायचे हे व्यक्तीवर आधारित आहे. ज्या व्यक्तीला आपण सन्मानित केले ते या दोन्ही गोष्टी सकारात्मकतेने घेतात. आज ज्यांना आपण सन्मानित केले ते पदावर असोत अथवा नसोत त्यांचे व्यक्तित्व आणि कार्य हे अनुकरणीय आहे. 

व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर तसेच संपादक विवेक गिरधारी, सरिता कौशिक, नीलेश खरे उपस्थित होते. मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी ह कार्यक्रम आयोजित केला होता. त कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चव्हाण यांनी केले.

लोकांना वाटले राख होतेय तेवढ्यात मी भरारी घेतली  

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मला दिलेल्या पुरस्काराचे नाव ‘फिनिक्स’ आहे. पण, मी काही राखेतून उभा राहिलेलो नाही. पण, अनेक वेळा लोकांना असे वाटले की माझी राख होतेय, तेवढ्यात मी भरारी घेतली. ही भरारी का घेऊ शकलो, कारण जेव्हा, जेव्हा राखेचा क्षण आला त्यातून मी सकारात्मकतेने पुढे गेलो.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसराजकारण