Join us

मंत्रालयातील चहापानाचा खर्च ऐकून आश्चर्य वाटले- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 13:42 IST

२०१५-१६ मध्ये मुख्यमंत्री कार्यालयात ५८ लाख रुपये चहावर खर्च झाले. तर २०१७-१८ मध्ये हा खर्च वाढून ३.४ कोटी इतका झाला.

मुंबई: गेल्या दिवसांपासून चर्चेत असलेल्या मंत्रालयातील चहा घोटाळ्यावर गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, चहापानावर इतका खर्च होत असेल, हे मला कधीच जाणवले नव्हते. त्यामुळे हा खर्च ऐकून मला आश्चर्यच वाटले, अशी टिप्पणी पवार यांनी केली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मिळालेल्या माहितीनुसार हा घोटाळा उघडकीस आणला होता. याबद्दल अधिक माहिती देताना संजय निरुपम म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा कोणत्या प्रकारची चहा पितात किंवा पाहुण्यांना पाजतात, त्यात असे काय टाकले जाते ? तेच कळत नाही. आजच्या काळात आपण ग्रीन टी, लेमन टी, हर्बल टी अशा वेगवेगळ्या प्रकारचे चहाचे प्रकार ऐकलेले आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस कदाचित सोन्याचा चहा पित असतील किंवा इतरांना पाजत असतील. माहितीच्या अधिकाराच्या पत्रकात असे दिसून येत आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात चहा-पाण्यावर होणाऱ्या खर्चामध्ये गेल्या २ वर्षांमध्ये कमालीची वाढ झालेली आहे. २०१५-१६ मध्ये मुख्यमंत्री कार्यालयात ५८ लाख रुपये चहावर खर्च झाले. तर २०१७-१८ मध्ये हा खर्च वाढून ३.४ कोटी इतका झाला. चहा-पाण्याच्या खर्चामध्ये ५७७% इतकी प्रचंड वाढ झाली. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात रोज १८,५०० कप चहा प्यायला जातो. ही बाब पचवायला जरा अवघडच आहे. एकीकडे रोज महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, तर दुसरीकडे चहावर होणा-या खर्चातही ५७७% इतकी वाढ केली जाते. हा एक खूप मोठा घोटाळा आहे. भाजपा सरकार हे घोटाळ्याचे सरकार आहे, असे निरूपम यांनी सांगितले होते.

टॅग्स :शरद पवारदेवेंद्र फडणवीस