Join us  

मी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 4:20 AM

आपल्या वडिलांच्या मृत्यूसंदर्भात नव्याने काही आरोप करण्यात येत आहेत. या विषयाचे राजकीय भांडवल करणारी मी राजकारणी नाही. मी हॅकर नाही.

मुंबई : आपल्या वडिलांच्या मृत्यूसंदर्भात नव्याने काही आरोप करण्यात येत आहेत. या विषयाचे राजकीय भांडवल करणारी मी राजकारणी नाही. मी हॅकर नाही. तपास यंत्रणा नाही. मी एक कन्या आहे, असे भावनिक उत्तर देत ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी मौन सोडले.२०१४च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीम हॅक करून भाजपाने विजय मिळविला होता. त्याबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे गौप्यस्फोट करणार असल्याने त्यांची हत्या करण्यात आली, असा गंभीर आरोप सायबर तज्ज्ञ आणि हॅकर सय्यद शुजा यांनी केला आहे. शुजा यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा उल्लेख केल्याने राज्यात खळबळ माजली असताना पंकजा यांनी त्यावर भाष्य करण्याचे टाळले होते. बुधवारी एका कार्यक्रमात पत्रकारांनी गाठले असता त्या म्हणाल्या की, अशा गोष्टींमुळे माझ्या कुटुंबीयांना मानसिक त्रासातून जावे लागत आहे. बाबांच्या मृत्यूनंतर मी स्वत: गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती. ती चौकशी पूर्ण झाली आहे. आता आणखी चौकशी करायची की नाही, याचा निर्णय पक्षातील मोठी लोकं घेतील. ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, असेही त्या म्हणाल्या.पुढच्या वेळी सत्ता भाजपाचीच येणार पण, मी कोणत्या खात्याची मंत्री असेन हे मला माहिती नाही. मला चॉईस दिला तर पुन्हा ग्रामविकास मंत्रीच व्हायला आवडेल, असेही पंकजा यांनी सांगितले.

टॅग्स :पंकजा मुंडे