Join us

गंभीर आजारांशी मीही लढलो, अभिनेते अमिताभ बच्चन यांची कबुली, केईएममध्ये फॅटी लिव्हर क्लिनिकचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 07:27 IST

Amitabh Bachchan News: मला टीबी झाला होता, लिव्हर सिरॉयसिसही झाला होता. काविळीमुळे माझे ७५ टक्के यकृत निकामी झाले आहे, २५ टक्के यकृतच काम करीत आहे. डॉक्टरांनी केलेल्या उपचारांमुळे मी दोन्ही आजारांतून बरा होऊन आज तुमच्यासमोर उभा आहे.

मुंबई -  मला टीबी झाला होता, लिव्हर सिरॉयसिसही झाला होता. काविळीमुळे माझे ७५ टक्के यकृत निकामी झाले आहे, २५ टक्के यकृतच काम करीत आहे. डॉक्टरांनी केलेल्या उपचारांमुळे मी दोन्ही आजारांतून बरा होऊन आज तुमच्यासमोर उभा आहे. आपण पोलिओला हरवले आहे. आता फॅटी लिव्हर आजारालाही हरवू, असा विश्वास सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोमवारी व्यक्त केला.  

केईएम रुग्णालयाच्या शताब्दीनिमित्त रुग्णालयात फॅटी लिव्हर आजाराशी संबंधित क्लिनिकचे उद्घाटन अमिताभ यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त विपीन शर्मा, अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, पोटविकारतज्ज्ञ डॉ. जयंत बर्वे, डॉ. आकाश शुक्ला  उपस्थित होते. 

केईएम रुग्णालयाने मला फॅटी लिव्हर आजाराबद्दल जनजागृतीसाठी ब्रँड ॲम्बेसेडर बनविले आहे. मी त्यासाठी चांगले काम करेन, मात्र शासनानेही मदत केली पाहिजे, अशी अपेक्षा अमिताभ यांनी व्यक्त केली. आपल्या आजारपणांविषयी अमिताभ यांनी  तपशीलवार माहिती दिली. 

तरुण डॉक्टर हे देशाचे भविष्यभाषणावेळी तुम्ही उद्याचे भविष्य आहात, आप है तो हम है, असे म्हणत अमिताभ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या रुग्णालयाला १०० वर्षे होत आहेत ही कौतुकास्पद बाब आहे, असे अमिताभ म्हणाले. 

माझे २५ टक्केच लिव्हर काम करतेअमिताभ म्हणाले, १९८२ साली कुली चित्रपटांचे चित्रीकरणावेळी मला मोठा अपघात झाला. तेथील एका छोट्या नर्सिंग होममध्ये मला दाखल केले होते. मला मुंबईला हलविण्यात धोका असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले आणि तेथेच माझ्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली.  आपल्या लिव्हर सिरॉयसिस आजाराबद्दल ते म्हणाले, १९८२मधील  अपघातानंतर मला रक्त चढविण्यात आले होते. त्यानंतर २००५ मध्ये त्रास होऊ लागला तेव्हा डॉ. बर्वेंचा सल्ला घेतला. चाचण्या केल्या गेल्या. मला चढवलेल्या दूषित रक्तातून काविळीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. माझे लिव्हर ७५ टक्के निकामी झाले आहे, २५ टक्केच काम करत आहे. 

अधिष्ठात्यांना दिला मानअमिताभ यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या रांगेतील मध्यभागी असलेले आसन देण्यात आले, मात्र तेथे बसण्यास त्यांनी नकार दिला आणि रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना तेथे बसण्याचा मान दिला. त्यानंतर बराच वेळ संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट सुरू होता.

टॅग्स :अमिताभ बच्चनकेईएम रुग्णालयमुंबई