अतिधोकादायक इमारती पावसाळ्यापूर्वी रिकाम्या?
By Admin | Updated: May 7, 2015 00:26 IST2015-05-07T00:26:44+5:302015-05-07T00:26:44+5:30
मुंब्य्रात घडलेल्या लकी कम्पाउंड इमारत दुर्घटनेनंतर पालिकेने यंदाही पावसाळ्यापूर्वी अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या वहिवाटी बंद करण्यात येणार आहेत.

अतिधोकादायक इमारती पावसाळ्यापूर्वी रिकाम्या?
रहिवाशांची वहिवाट बंद होणार : १० तारखेपर्यंत यादी जाहीर
अजित मांडके, ठाणे
मुंब्य्रात घडलेल्या लकी कम्पाउंड इमारत दुर्घटनेनंतर पालिकेने यंदाही पावसाळ्यापूर्वी अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या वहिवाटी बंद करण्यात येणार आहेत. तसेच शहरातील धोकादायक, अतिधोकादायक इमारतींच्या सर्व्हेचे काम पालिकेने हाती घेतले असून यामध्ये सर्वाधिक २६ अतिधोकादायक इमारती मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीत आहेत. परंतु, एकूणच १० मेपर्यंत सर्वच प्रभाग समित्यांमधील अशा इमारतींची यादी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच या इमारती पावसाळ्यापूर्वी संपूर्णपणे रिकाम्या करून येथील रहिवाशांची वहिवाट बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी पालिकेचे प्रभारी आयुक्त सुनील चव्हाण यांनी अतिक्रमण विभागाची एक बैठक घेतली असून या बैठकीनंतर त्यांनी हे आदेश दिले आहेत. पालिकेने २०१४ मध्ये जाहीर केलेल्या यादीत शहरात २५४४ धोकादायक आणि ६३ अतिधोकादायक इमारती होत्या. अतिधोकादायक इमारतींपैकी ४२ इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. शिल्लक २१ इमारतींपैकी १० दुरुस्त करण्यात आल्या होत्या. तसेच ३ इमारतींवर न्यायालयीन स्थगिती होती. एकूणच नंतर १४ पैकी १० इमारतींवर कारवाई करण्यात येऊन केवळ ४ इमारती शिल्लक राहिल्या होत्या.
परंतु, आता पावसाळ्यापूर्वीच्या सर्व्हेला पालिकेच्या अतिक्रमण विभागाने सुरुवात केली असून मुंब्य्रात सर्वाधिक २६ इमारती अतिधोकादायक स्थितीत आहेत. त्याखालोखाल कळव्यात ७ इमारती या यादीत आहेत. तसेच इतर प्रभाग समित्यांतदेखील हा आकडा पाचच्या आतमध्येच असल्याची माहिती प्रभारी आयुक्त सुनील चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना दिली. परंतु, या इमारतींचा सर्व्हे हा अपूर्ण असून तो लवकरच पूर्ण करून त्याची यादी १० मे रोजी जाहीर केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच शहरातील धोकादायक इमारतींचा सर्व्हेदेखील अंतिम टप्प्यात असून तोदेखील लवकरच पूर्ण करण्यात येऊन यामध्ये ज्या इमारती जोखमीच्या असतील, त्या इमारतधारकांना नोटीस बजावण्यात येणार आहे.
याशिवाय, शहरात नव्याने अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, याची दक्षता घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु, जर अशा प्रकारे बांधकामे होत असतील तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालिकेने घेतलेल्या दक्षतेमुळे २०१४ मध्ये एकही दुर्घटना नाही
४ एप्रिल २०१३ रोजी मुंब्य्रातील लकी कम्पाउंड इमारत दुर्घटनेनंतर पालिकेने २०१४ मध्ये घेतलेल्या दक्षतेमुळे शहरात एकही इमारत दुर्घटना घडली नाही. दुर्घटना घडण्यापूर्वीच पालिकेने अतिधोकादायक ४२ इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन केले होते. तसेच धोकादायक इमारतींना नोटीस बजावल्या होत्या. तसेच स्ट्रक्चरल आॅडिट करण्यास सांगितले गेल्याने काही इमारतधारकांनी आपल्या इमारती दुरुस्त करून घेतल्या आहेत.
दोस्ती रेंटलमध्ये ७०० घरे आजही रिकामी
यापूर्वी महापालिकेने शहरातील इमारत दुर्घटनेत बाधित झालेल्या रहिवाशांचे वर्तकनगर येथील दोस्ती रेंटल हाऊसिंग स्कीममध्ये पुनर्वसन केले आहे. येथे १४४८ घरे असून ७४८ रहिवाशांचे येथे पुनर्वसन करण्यात आले असून आजच्या घडीला ७०० घरे रिकामी आहेत.
ठाणे शहरात ५३४२ अनधिकृत इमारती
पालिकेच्या २०१४ च्या आकडेवारीनुसार शहरात आजच्या घडीला ५३४२ अनधिकृत इमारती आहेत. त्यात मुंब्रा- १८६६, नौपाडा- ३९९, कोपरी- ७०, वागळे-१०४८, उथळसर- ५५२, कळवा- ५३४, माजिवडा- मानपाडा- २९५, वर्तकनगर- २८७ इमारती आहेत.
आतापर्यंत घडलेल्या इमारत दुर्घटनांत मृत आणि जखमी झालेल्यांची संख्या
दिनांकघटनामृतजखमी
१४-१२-१९९५रशीद कम्पाउंड २४१३
०७-११-९८साईराज, वागळे१६१४
०१-०५-९९प्रदीप स्मृती, महागिरी०७१०
२८-१२-२००७आशर आयटी पार्क इमारत०४१२
१६-०६-२०१०दोस्ती विहार कम्पाउंड०८०५
०३-०८-२०१०शब्बे अपार्टमेंट, कळवा००००
१७-०८-२०१०सोनाबाई निवास, कळवा१००५
१९-०८-२०१०घरे कोसळली, मुंब्रा०६०४
२१-०९-२०१०नौपाडा, इमारत०००१
०४-०४-२०१३लकी कम्पाउंड७४५६
२१-०६-२०१३स्मृती निवास, मुंब्रा१०१०
२१-०९-२०१३बानू इमारत, मुंब्रा०४००
१८-११-२०१३चार मजली इमारत, कळवा ००००
एकूण१६३१३०