Join us  

मुंबई डबेवाला संघटनेचा हैदराबाद पोलिसांना पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 2:39 AM

हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिला जाळून मारणाऱ्या चारही नराधमांचा हैदराबाद पोलिसांनी एन्काउंटर केला.

मुंबई : हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिला जाळून मारणाऱ्या चारही नराधमांचा हैदराबाद पोलिसांनी एन्काउंटर केला. या प्रकरणी देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. राष्ट्रीय मानव हक्क आयोगाने पोलिसांच्या या कारवाईची चौकशीची मागणी केली असताना, मुंबई डबेवाला संघटनेकडून मात्र हैदराबाद पोलिसांना पाठिंबा देण्यात आला आहे. हैदराबाद पोलिसांना पाठिंबा देणारा व्हिडीओ त्यांनी फेसबुकवर टाकला आहे.

मात्र, पोलिसांचे मनोबल खचू नये, यासाठी त्यांना पाठिंबा देणारा व्हिडीओ मुंबई डबेवाला संघटनेकडून फेसबुकवर टाकण्यात आला. विशेष म्हणजे, हैदराबाद पोलिसांनी केलेले एन्काउंटर हे योग्यच असल्याचे मुंबई डबेवाला संघटनेचे सहप्रवक्ते विलास शिंदे यांनी सांगितले. एन्काउंटर करणे कायदेशीर नसले, तरी यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला असून, भविष्यात लांबणाºया न्यायालयीन प्रक्रियेतून त्यांची सुटका नक्कीच होणार आहे. यापुढे कोणताही गुन्हेगार असे कृत्य करताना हजारदा नक्कीच विचार करेल व गुन्हा करण्यास धजावणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी बोलून दाखविला.

एन्काउंटर करून गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे अधिकार पोलिसांना नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. एन्काउंटर करून बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा देण्याचे कोणत्या कायद्यात बसते, असा आरोप आता होऊ लागला आहे. मग निष्पाप तरुणीवर बलात्कार करून तिला जाळून मारणे हे कोणत्या कायद्यात बसते, असा संतप्त सवाल मुंबई डबेवाला संघटनेचे सहप्रवक्ते विनोद शेटे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :हैदराबाद प्रकरणमुंबई डबेवालेमुंबईपोलिस