Join us

पतीचा गळफास, पत्नीवर गुन्हा दाखल; आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

By गौरी टेंबकर | Updated: July 13, 2024 13:13 IST

वर्षभरापूर्वी पतीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याप्रकरणी पत्नी विरोधात एमएचबी कॉलनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई: वर्षभरापूर्वी पतीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याप्रकरणी पत्नी विरोधात एमएचबी कॉलनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मयताच्या आईला मुलाने लिहिलेली डायरी सापडल्यानंतर तिने याप्रकरणी तक्रार दिली असून तपास सुरू आहे. 

तक्रारदार रेखा मुसळे (६९) यांचे बोरिवली पश्चिम परिसरात घर आहे. मात्र त्या पालघरच्या घरामध्ये अधिक वेळ राहायला असतात. त्यांचा मुलगा चेतन याचे २००७ मध्ये आयुषी उर्फ गौरी हिच्याशी लग्न झाले आणि दोघे त्यांच्या मुलासह एकत्रच २०२० पर्यंत बोरिवलीतील घरात राहायचे. तक्रारदार देखील त्यांच्या घरी अधून मधून एक-दोन दिवसासाठी राहायला यायच्या. मात्र चेतन आणि आयुषीमध्ये पटत नसल्याने जुलै २०२० मध्ये तिने मुलाला घेऊन सासरचे घर सोडले. तसेच भाईंदरमध्ये असलेल्या तिच्या माहेरी जाऊन राहू लागली. त्यामुळे चेतन नैराश्यात गेला मात्र त्याने त्याची आई रेखा यांना त्यांच्यातील वादाचे कारण कधीच सांगितले नाही. तसेच माझी बायको आणि मुलाला परत आणा असेही तो त्यांना सांगायचा. त्यांची सून ही घर सोडून गेल्यापासून सासरच्यांच्या संपर्कात नव्हती. तसेच तिला घरी परत यायचं नव्हते असेही मुसळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर

चेतनने २९ ऑगस्ट, २०२३ रोजी राहत्या घरी सिलिंगला दोरीसारख्या दिसणाऱ्या केबलने गळफास घेतला. ही बाब मुसळे यांनी सर्वात आधी पाहिली आणि पोलीस, शेजारच्यांना तसेच आयुषीच्या घरच्यांना कळवले. मुलाच्या अंत्यसंस्कारानंतर एक दिवशी घराची साफसफाई करताना त्यांना चेतनची एक डायरी सापडली. त्यामध्ये इंग्रजीत लिहिलेल्या मजकुरानुसार आयुष्य आणि त्याची सासू अंजली जोशी यांच्याकडून त्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचा उल्लेख होता. तसेच चेतनने मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोटही पोलिसांनी तपासकामी जमा केली आहे. त्यामुळे पत्नी आणि सासूने मुलाला मानसिक आणि आर्थिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप मुसळे यांनी केला असून याप्रकरणी दोघींविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सध्या आयुषी विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी