Join us  

आचारसंहितेपूर्वी प्रस्ताव मंजूर करण्याची बेस्ट समितीची घाई; ताफ्यात 1 हजार मिनी बसगाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 12:59 AM

महापालिकेने काही अटी-शर्तींवर बेस्ट उपक्रमाला अनुदान देण्याची तयारी दाखवली. यामध्ये बसगाड्या भाड्याने घेणे, मिनी-मिडी बसचा ताफ्यात समावेश करणे, बस ताफा सात हजारांपर्यंत नेणे, भाडेकपात करणे यांचा समावेश होता.

मुंबई : बेस्ट उपक्रमाने तिकिटांच्या दरांमध्ये मोठी कपात केल्यानंतर प्रवाशांची संख्या तब्बल २७ लाखांवर पोहोचली आहे. यामुळे महापालिकेच्या शर्तीनुसार बेस्ट उपक्रम बसगाड्यांचा ताफा तीन हजारांनी वाढविणार आहे. त्यानुसार एक हजार बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये मिडी-मिनी वातानुकूलित डिझेल आणि सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. मात्र यासाठी बेस्ट उपक्रमाला २६२२ कोटी ६० लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पहिल्यांदाच रविवारी बेस्ट समितीची बैठक बोलाविण्यात आली आहे.

महापालिकेने काही अटी-शर्तींवर बेस्ट उपक्रमाला अनुदान देण्याची तयारी दाखवली. यामध्ये बसगाड्या भाड्याने घेणे, मिनी-मिडी बसचा ताफ्यात समावेश करणे, बस ताफा सात हजारांपर्यंत नेणे, भाडेकपात करणे यांचा समावेश होता. जुलै महिन्यात बेस्ट उपक्रमाने प्रवासी भाडे किमान पाच ते कमाल २० रुपये केले. त्यामुळे १७ लाखांपर्यंत आलेल्या बेस्ट प्रवाशांची संख्या गेल्या तीन महिन्यांमध्ये २७ लाखांवर पोहोचली आहे. मात्र त्याप्रमाणात बेस्टगाड्यांची संख्याही वाढविणे आवश्यक असल्याने बेस्ट उपक्रमाची धावपळ सुरू आहे.

त्यानुसार पाचशे मिडी आणि मिनी बसगाड्यांची नोंदणी बेस्ट उपक्रमाने केली आहे. तसेच महिलांसाठी तेजस्विनी बस सेवा, पर्यावरणपूरक इलेक्ट्रॉनिक बसगाड्याही बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्यानंतर आता आणखी एक हजार बसगाड्या घेण्यात येणार आहेत. यामध्ये डिझेलवर चालणाºया पाचशे वातानुकूलित मिनी बसगाड्या, पाचशे मिडी वातानुकूलित सीएनजीवर चालणाºया बसगाड्यांचा समावेश आहे. या बसगाड्यांचा ताफा बेस्ट उपक्रमात दाखल झाल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.अशा दाखल होणार गाड्यासध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात तीन हजार २०० बसगाड्या आहेत. डिझेलवर चालणाºया पाचशे मिनी बसगाड्या दोन टप्प्यांमध्ये बेस्ट उपक्रमामध्ये दाखल होणार आहेत. हंसा ट्रॅव्हल्स आणि एम.पी. इंटरप्रायझर्स प्रत्येकी अडीचशे मिनी वातानुकूलित बसगाड्यांचा पुरवठा करणार आहेत. हा करार आठ वर्षांसाठी आहे. यासाठी हंसा ट्रॅव्हल्सला ४७७ कोटी ५४ लाख, एम.पी. ट्रॅव्हल्सला ४७७ कोटी ५४ लाख बेस्टतर्फे देण्यात येणार आहेत. मारुती ट्रॅव्हल्सकडून पाचशे मिडी वातानुकूलित सीएनजी बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येतील. त्यांच्याबरोबर आठ वर्षांसाठी करार करण्यात येणार असून एक हजार ६६७ कोटी ५२ लाख रुपये देण्यात येतील.बेस्ट समितीची रविवारी बैठकआगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. बेस्ट उपक्रमासाठी महत्त्वाचा असलेला हा प्रस्ताव त्यापूर्वी मंजूर होणे आवश्यक आहे. बेस्ट समिती सदस्यांना प्रस्ताव पाठवून ७२ तास न झाल्यामुळे विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला. मात्र सोमवारी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने पहिल्यांदाच बेस्ट समितीची बैठक येत्या रविवारी होईल.

टॅग्स :बेस्ट