नांदगाव परिसरात वादळी वाऱ्याने नुकसान
By Admin | Updated: September 26, 2014 23:34 IST2014-09-26T22:26:03+5:302014-09-26T23:34:38+5:30
मुसळधार पाऊस : वीज पुरवठा खंडीत, घरांचे पत्रे उडाले

नांदगाव परिसरात वादळी वाऱ्याने नुकसान
नांदगाव : नांदगाव परिसरात गुरूवारी सायंकाळी झालेल्या वादळीवाऱ्याने व मुसळधार पावसामुळे अनेक घरांचे पत्रे, कौले उडून सुमारे ७५ हजार रूपयांचे नुकसान झाले. तर वाशिंगवाडी येथे विद्युतवाहिन्यांवर झाड कोसळल्याने विजेचे चार खांब मोडून विद्युतवाहिन्या तुटल्यामुळे या परिसरातील विद्युत पुरवठा शुक्रवारी दुपारपर्यंत सुरळीत झाला नव्हता. यासाठी महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर काम करताना दिसत होते. तर जोरदार वारा, मुसळधार पाऊस आणि भयंकर आवाज करीत लखलखणाऱ्या विजेच्या भीतीपोटी या भागातील लोकांनी गुरूवारची संध्याकाळ दरवाजा-खिडक्या बंद करून काढली.
गुरूवारी सकाळपासूनच या भागात उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली होती. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि विजेचा लखलखाट करीत जोरदार पाऊस सुरू झाला व याचवेळी सोसाट्याचा वारा सुरू झाला. त्यामुळे अनेक घरांच्या छप्परांची पडझड झाली.
यामध्ये अमोल गावकर यांच्या शेडचे पत्रे उडून ३२ हजार ४००, सत्वशीला मोरये यांच्या घरावर माडाचे झाड कोसळून १० हजार १२२, शशिकांत शेटये यांचे ४ हजार ८७५, प्रकाश मोरये यांचे ९ हजार ५००, मराहबी नावलेकर यांचे ३ हजार ६२५, जयवंती पाटील यांचे ७ हजार १००, शामसुंदर मोरये यांचे ३ हजार, अल्फाज नावलेकर यांचे १ हजार २०, प्रभावती सदडेकर यांचे १ हजार ५०० रुपयांचे तसेच इतर किरकोळ नुकसान धरून सुमारे ७ हजार ५०० रूपयांचे नुकसान झाले.
नांदगाव वाशिंगवाडी येथे झाड कोसळून चार वीजखांब तुटले. नांदगाव बौद्घवाडी येथे विद्युत वाहिन्यांवर झाड पडल्याने येथील तारा तुटल्या. त्यामुळे नांदगाव परिसरातील गावात रात्रभर वीजपुरवठा खंडीत झाला होता. शुक्रवारी दुपारपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी प्रयत्न करीत होते.
बंद लाईटही पेटू लागल्या
आकाशातून लखलखणाऱ्या विजेची तीव्रता एवढी होती की वादळीवारा व ढगांच्या गडगडाटामुळे या भागातील वीज बंद करण्यात आली होती. मात्र, या नैसर्गिक विजेच्या झटक्यामुळे बंद असलेल्या लाईटही काही वेळ पेटू लागल्याने लोकांना हा नक्की प्रकार काय व काय करावे? हे सुचेनासे झाले. यामुळे लोकांना रात्र अंधारातच काढावी लागली. शिवाय निसर्गाच्या रौद्रावताराने संपूर्ण संध्याकाळ भीतीच्या वातावरणात घालवावी लागली. (प्रतिनिधी)