Join us  

'त्या’ मागणीसाठी आत्महत्याग्रस्त मराठा कुटुंबियांचे बेमुदत उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 9:17 PM

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आले.

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या मराठा कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांनी मंगळवारपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आले. शासनाने १० लाख रुपये आणि शासकीय नोकरीचे आश्वासन पाळले नसल्याने बेमुदत उपोषण सुरू केल्याची माहिती समन्वयकांनी दिली.

यावेळी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला. उपस्थित १७ आत्महत्याग्रस्त कुटुंबियांपैकी नांदेडच्या मनकरणा गणपत आबादार यांनी सरकारविरोधात टाहो फोडला. त्या म्हणाल्या की, शासनाकडून मदत तर दूरच मात्र साधी विचारपूसही करण्यात आलेली नाही. आरक्षणासाठी पतीने आत्महत्या केली. मात्र सत्ताधारी पक्षातील कोणत्याही नेत्याने सांत्वन किंवा मदत केली नाही. घरी १२ वर्षांची मुलगी आणि ५ वर्षांचा लहान मुलगा आहे. अवघ्या एक एकर शेतीमध्ये कुटुंब कसे चालवायचे हा प्रश्न आहे. सरकारने शासकिय नोकरी आणि १० लाख रुपयांच्या मदतीची केवळ घोषणाच केली. मात्र ५ आॅगस्टला पतीने आत्महत्या केली असूनही तीन महिन्यांनंतर सरकार झोपलेलेच आहे. परिणामी, सरकारला जाग येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्हाला मुलाने सांभाळायच्या वयात आम्हीच नातवंडांना सांभाळत असल्याची व्यथा बीडच्या तुकाराम काटे यांनी व्यक्त केली. शेतमजूरी करणाºया काटे यांचा मुलगा शिवाजी याने ३ आॅगस्टला आत्महत्या केली होती. तुकाराम काटे म्हणाले की, मुलाच्या शिक्षणासाठी पैसे नसल्याचे कारण लिहित मुलाने आत्महत्या केली. त्यामुळे आता कुटुंबाची जबाबदारी म्हाताºया खांद्यावर आली आहे. सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे किमान नातवाला सरकारी नोकरी मिळाली, तर उदरनिर्वाह तरी करता येईल.

 

ओबीसीमध्ये स्वतंत्र आरक्षण द्या!

सरकारने ओबीसींमधील इतर जातींच्या आरक्षणाला धक्का न लावता ओबीसीमध्येच स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी समन्वयकांनी केली आहे. आत्महत्या केलेल्या मराठा कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा समन्वयकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.

टॅग्स :शेतकरी आत्महत्याविधान भवनमराठा क्रांती मोर्चा