हास्य कृत्रिम नको, निखळ हवे

By Admin | Updated: May 4, 2015 03:33 IST2015-05-04T03:33:34+5:302015-05-04T03:33:34+5:30

अंधेरी येथे १३ मे १९९५ रोजी डॉ. मदन कटारिया यांनी स्थापन केलेल्या लाफ्टर क्लबला २० वर्षे पूर्ण झाली असतानाच आजघडीला क्लबचे जाळे जगभर

Humor should not be artificial, flimsy | हास्य कृत्रिम नको, निखळ हवे

हास्य कृत्रिम नको, निखळ हवे

मुंबई : अंधेरी येथे १३ मे १९९५ रोजी डॉ. मदन कटारिया यांनी स्थापन केलेल्या लाफ्टर क्लबला २० वर्षे पूर्ण झाली असतानाच आजघडीला क्लबचे जाळे जगभर पसरले आहे. जगभरात १०१ देशांत १२ हजारांहून अधिक क्लब आहेत. मुंबईतल्या क्लबची संख्या ४०० हून अधिक आहे. या क्लबमध्ये ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थी वर्गही सहभागी होत आहेत. मात्र अशा लाफ्टर क्लबची खरेच गरज आहे का, की हे फक्त निमित्त आहे? सोशल नेटवर्क साइट्सवरच्या विनोदानेही मनुष्य हसत असला तरी हे हास्य कृत्रिम आहे का, यावर तज्ज्ञांनी मते व्यक्त केली आहेत.
माहिती-तंत्रज्ञान या विषयातील तज्ज्ञ माधव शिरवळकर यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा फेसबुक किंवा व्हॉट्सअ‍ॅप नव्हते, तेव्हा हसण्याची माध्यमे वेगळी होती, तेव्हा माहिती तंत्रज्ञानाने क्रांती केली नव्हती, तेव्हा विनोदी पुस्तके होती. विनोदी पुस्तके वाचताना आपण स्वत:शीच हसत होतो. रेडिओ ऐकताना आपण स्वत:शी हसत होतो. मात्र आता माध्यमे बदलली आहेत, तरीही मनुष्य स्वत:शीच हसतो आहे. हे हास्य कृत्रिम नाही. कारण हसविणारे माध्यम बदलले आहे, हसणे थांबलेले नाही.
गोरेगाव येथील रहेजा लाफ्टर क्लबचे आत्माराम तोरणे यांच्या म्हणण्यानुसार, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवरच्या विनोदावर हसण्याला काही मर्यादा आहेत. कारण तिकडे तोचतोपणा आहे. आमचे हसणे हे व्यायामासाठीचे आहे.
आम्ही हसतो तेव्हा मनातल्या सकारात्मक विचारांना चालना मिळते. आमचे हसणे शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक असते. आमचे हास्य अहंकार दूर करते. मात्र व्हॉट्सअ‍ॅपच्या हसण्याने तात्पुरता व्यायाम होतो. येथे तुम्ही एकटेच हसता. ते काही क्षणांपुरते असते, म्हणून त्यामध्ये कृत्रिमपणा येतो.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांच्या मते, लाफ्टर क्लब आणि व्हर्च्युअली हसणे हे खरे हसणेच नाही. एखादी गोष्ट पाहिल्यावर येणारे खुदकन हसू, दाद देण्यासाठी दिलेले स्मितहास्य हेच खरे हास्य आहे. पण याचा विसर पडतो आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर अनेक जण दिवसांतून अनेकदा हसतात, पण याचा काहीच फायदा नाही. धावत्या जगात एकत्र येण्यासाठी आता व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीचा वापर होतो. एका व्यक्तीने जोक टाकला आणि त्यावर प्रतिक्रिया आल्या नाहीत तर तो अस्वस्थ होतो. खरेपणाने कोणीच दाद देत नाही, हे माहीत असूनही ती प्रतिक्रिया हवी असते. जोक टाकणारी व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पेस्ट करीत असतो. त्यामागे कोणत्याही भावना नसतात. प्रत्येकाकडे वेळ नाही. बोलण्याची ताकद नाही, यामुळे व्हर्च्युुअल जगात रममाण होतात. आयुष्यात बोलणे, त्यावर प्रतिक्रिया देणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मनापासून हसल्यावरच भावनांचा निचरा होतो, व्यक्तीला समाधान मिळते. लाफ्टर क्लब ही अनेक ठिकाणी आहेत, पण त्यातही तथ्य नाही. पूर्वापार आपल्याकडे पूजा कशी करायची हे ठरलेले आहे. ती एक क्रिया झाली आहे. तसेच लाफ्टर क्लबचेही झाले आहे. एकत्र येऊन नियम म्हणून लोक हसतात. यामुळे भावनांचा निचरा होत नाही, हे हास्य नाही.

Web Title: Humor should not be artificial, flimsy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.