Join us  

शिक्षणात मानवी मूल्यांचा अतंर्भाव व्हावा - दलाई लामा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 12:48 AM

शांतता आणि अहिंसेने अनेक प्रश्नांची उकल होऊ शकते. त्यासाठी मूळ मानवी मूल्यांना ओळखणे गरजेचे आहे. म्हणूनच मूळ मानवी मूल्यांचा शिक्षण पद्धतीत अंतर्भाव व्हावा, असे प्रतिपादन जागतिक बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी बुधवारी केले.

मुंबई : भारताला ज्ञानाची उज्ज्वल परंपरा आहे. पूर्वीपासूनच भारतीय संस्कृतीमध्ये अहिंसा, करुणा ही मूल्ये अस्तित्वात आहेत. शांतता आणि अहिंसेने अनेक प्रश्नांची उकल होऊ शकते. त्यासाठी मूळ मानवी मूल्यांना ओळखणे गरजेचे आहे. म्हणूनच मूळ मानवी मूल्यांचा शिक्षण पद्धतीत अंतर्भाव व्हावा, असे प्रतिपादन जागतिक बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी बुधवारी केले. मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘द कन्सेप्ट आॅफ मैत्री (मेत्ता) इन बुद्धिजम’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.बौद्ध धर्मातील मैत्री संकल्पनेवर प्रकाश टाकताना ते पुढे म्हणाले की, मैत्री, करुणा आणि प्रेमभावना या मूळ तत्त्वांचा अंगीकार करून, अनेक मोठ्या समस्यांना उत्तर दिले जाऊ शकते. जीवनात कोणत्याही समस्यांचे निराकरण हातात शस्त्रे घेऊन होऊ शकत नाही. शस्त्रांमुळे जगाने मोठी किंमत मोजली आहे. संवादाचा वापर करणे गरजेचे आहे. २१व्या शतकात लोकांना शांती हवी आहे. हिंसेला लोक कंटाळले आहेत. त्यामुळे आपण एकमेकांचा आदर ठेऊन मूळ मानवी मूल्यांचा शिक्षण पद्धतीत अंतर्भाव करायला हवा. अहिंसा आणि करुणेमुळे क्रोधावर सहजपणे मात करता येते, असे ते म्हणाले.एकोप्यासाठी म्हणून धर्माकडे पाहणे गरजेचे असून, धर्माच्या नावावर विभागणी होणे हे स्वीकाहार्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या फलॉसॉफिकल ट्रॅडिशन आॅफ द वर्ल्ड या जर्नलचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये अनेक मान्यवर आणि शिक्षणतज्ज्ञ बौद्ध धर्मातील मैत्री या संकल्पेवर त्यांचे विचार मांडतील.सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. सुनिल भिरुड, तत्त्वज्ञान विभागाच्या विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. गीता रमणा, प्राध्यापक डॉ. अर्चना मलिक, आयोजन समितीचे सदस्य प्राध्यापक संदेश वाघ यांच्यासह अनेक मान्यवर या परिषदेला उपस्थित होते.

टॅग्स :दलाई लामाशिक्षण