Join us

केईएम रुग्णालयात कोरोना लसीची मानवी चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 04:25 IST

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोरोनावरील लसीचा प्रयोग लवकरच मुंबईतील रुग्णालयांत करण्यात येईल.

मुंबई : कोरोनावर उपाय शोधण्यासाठी ^‘लोकल ते ग्लोबल’ असे सर्वत्र प्रयत्न सुरू असताना आता या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी सकारात्मक बाब समोर आली आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोरोनावरील लसीचा प्रयोग लवकरच मुंबईतील रुग्णालयांत करण्यात येईल. अमेरिका व ब्राझीलसह आता मुंबईतील केईएम या पालिका रुग्णालयात मानवी चाचणी होईल.आॅक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोविशिल्ड लसीच्या निर्मितीत पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटचा महत्त्वाचा वाटा आहे. देशातील १० केंद्रांवर या लसीचे मानवी प्रयोग होतील. प्रयोगाची ही दुसरी व तिसरी चाचणी आहे. पुढील आठवड्यापासून प्रयोग सुरू होईल. देशभरातील १,६०० व्यक्तींवर तर केईएम रुग्णालयातील १६० व्यक्तींवर या लसीची चाचणी करण्यात येईल. केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने केईएम रुग्णालय प्रशासनाला पत्राद्वारे या लसीच्या प्रयोग चाचणीविषयी कळविले आहे. त्यानुसार राज्याच्या कोविड टास्क फोर्सच्या नेतृत्वाखाली या लसीची चाचणी करण्यात येईल.डॉ. देशमुख म्हणाले, ही लस कोविड न झालेल्या २० ते ५० वयोगटातील व्यक्तींना देण्यात येईल. ज्यांच्या शरीरात कोरोनाविरोधातील प्रतिपिंडे तयार झाली आहेत, त्यांना या चाचणीत समाविष्ट केले जाणार नाही. चाचणीतून अति तरुण, अतिवृद्धांना वगळण्यात येईल. ब्रिटनमध्ये या चाचणीचा पहिला टप्पा पार पडला.पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, केईएममध्ये होणाऱ्या मानवी चाचणी प्रयोगातील व्यक्तींकडून लस चाचणीविषयी परवानगी घेण्यात येईल. मुंबई पालिकेने कोरोनाविषयी केलेल्या कामामुळे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने केईएमची निवड केली, हे पालिकेच्या कामाचे कौतुक आहे.

टॅग्स :केईएम रुग्णालय