मानवी हक्क आयोगाला पीएफ थकवल्याने साकडे
By Admin | Updated: August 11, 2014 04:21 IST2014-08-11T04:21:12+5:302014-08-11T04:21:12+5:30
अरोरा हे पंजाब आणि सिंध बँकेच्या काळबादेवी शाखेतून व्यवस्थापक या पदावरून ३० डिसेंबर २०१३ रोजी निवृत्त झाले. कारकिर्दीत आपण बँकेची कर्जवसुली ६० लाखांवरून सहा लाखांवर आणली

मानवी हक्क आयोगाला पीएफ थकवल्याने साकडे
मालाड : बँक अधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चार वेळा प्रशंसापत्र देणाऱ्या बँकेने निवृत्त होताना कर्तव्यात कसूर केल्याबाबत आरोपपत्र देऊन आपला भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटी गोठवल्याबाबत जोगिंदर सिंग अरोरा या ज्येष्ठ नागरिकाने मानवी हक्क आयोगाला साकडे घातले आहे.
अरोरा हे पंजाब आणि सिंध बँकेच्या काळबादेवी शाखेतून व्यवस्थापक या पदावरून ३० डिसेंबर २०१३ रोजी निवृत्त झाले. कारकिर्दीत आपण बँकेची कर्जवसुली ६० लाखांवरून सहा लाखांवर आणली. या कामगिरीबाबत बँकेने चार वेळा लेखी प्रशंसापत्रे दिली. मात्र निवृत्त होताना वरिष्ठांनी कर्तव्यात कसूर केल्याबाबत आरोपपत्र देत आपला भविष्य निर्वाह निधी तसेच इतर देणी गोठवल्याची अरोरा यांची तक्रार आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचा भंग करत नेमणूक करणाऱ्या बँकेने कोणत्याही प्रकारची नोटीस न देता ही कारवाई केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याबाबत अरोरा यांनी चौकशी समितीला निवेदनही सादर केले आहे.
तर अरोरा यांना त्यांच्या हिश्शाचा भविष्य निर्वाह निधी दिला असून नियमानुसार बँकेच्या हिश्शाचा निधी दिला नसल्याचे पंजाब आणि सिंध बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक अशोक गणपत्ये म्हणाले. कोणत्याही आरोपावरून भविष्य निर्वाह निधी गोठवता येत नसताना अरोरा यांना होणाऱ्या मानसिक छळाबाबत चौकशी करून त्यांना न्याय देण्यात यावा, असे निवेदन भ्रष्टाचार व अपराध निवारक परिषद अध्यक्ष मोहन कृष्ण यांनी राज्यपालांना दिले आहे. (प्रतिनिधी)