Join us

गोरेगावमधील फिल्म स्टुडिओला भीषण आग; ५० ते ६० कलाकारांना सुरक्षितपणे काढले बाहेर

By मुकेश चव्हाण | Updated: February 2, 2021 18:14 IST

आगीचे कारण अद्याप समोर आले नसून या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुंबई: गोरेगाव पश्चिममधील बांगुल नगर येथील मोकळ्या जागेत उभारण्यात आलेल्या एका चित्रीकरणाच्या स्टुडिओला दुपारी ४.३० वाजेच्या सुमारांस भीषण आग लागली. या आगीत स्टुडिओतील सर्व सामान जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर  तब्बल एक तासांच्या ही आग नियंत्रणात आली आहे.

'आदिपुरुष' या चित्रपटाच्या सेटला आग लागल्याची घटना मंगळवारी मुंबईत घडली. ओम राऊत यांच्या दिग्दर्शनात साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या क्रोमा शूटसाठी मुंबईत सेट लावण्यात आला होता. अभिनेता सूर्या हा इथं एका दृश्याचं चित्रीकरण करत होता तेवढ्यातच सेटला आग लागली. आगीची माहिती मिळताच सेटवरील ५० ते ६० कलाकार आणि कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. त्यामुळं यामध्ये मोठी हानी टळली.

आगीचे कारण अद्याप समोर आले नसून या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या स्टुडिओत खुर्च्या आणि इतर फर्निचर होतं. त्यामुळे आगीने लाकडी सामानाला तात्काळ पेट घेतला. त्यातच सोसायट्याचा वारा सुटल्याने ही आग अधिकच भडकली. बघता बघता आगीने उग्ररुप धारण केलं होतं. आग आणि धुराचे लोट पसरल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती.

 

टॅग्स :आगमुंबई