Join us

मिठी आणखी वेगाने वाहणार; पुरावरही नियंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 05:31 IST

Mumbai News : मुंबईतल्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेगाने कामे केली जात आहेत. मिठी नदीच्या कामासदेखील वेग आला आहे.

मुंबई : मुंबईतल्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेगाने कामे केली जात आहेत. मिठी नदीच्या कामासदेखील वेग आला आहे. आजमितीस रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम ९५ टक्के आणि मिठी नदीची संरक्षक भिंत बांधण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे मिठी नदीच्या धारण क्षमतेमध्ये दुपट्टीने आणि वहनक्षमतेमध्ये तीन पटीने वाढ झाली आहे.मिठी नदीच्या विकासाचा आणि प्रदूषण नियंत्रणाचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्याची चार पॅकेजमध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे. एकमध्ये पवई येथील फिल्टर पाड्यापासून बांधकाम करणे, मलनिस्सारण वाहिनी टाकणे, सर्व्हिस रोड बांधकाम, आठ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या मलजल प्रक्रियेचे बांधकाम अशा १३३ कोटींच्या कामांचा समावेश आहे. दोनमध्ये संरक्षक भिंत, सेवा रस्ता, पवईसह कुर्ला येथे मलनिस्सारण वाहिनी टाकणे इतक्या ५७० कोटींच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. तीनमध्ये संरक्षक भिंत, सेवा रस्ता, मलनिस्सारण वाहिनी, पूल अशा कामांसाठी एक हजार ८७५ कोटी आहेत. चारमध्ये बापट नाल्यापासून सफेद पूल नाला ते घाटकोपर मलजल प्रक्रिया केंद्रापर्यंत बोगद्याचे काम अंतर्भूत असून, या कामाचा खर्च २७० कोटी असून, अर्थसंकल्पात ३४७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.दहिसर, पोयसर, ओशिवरा या नद्यांच्या कामांसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. मिठी नदीच्या कामासह येथे पर्यटन आणि कृत्रिम तलावाचे काम करण्यात येणार आहे. याकरिता सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असून, ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. छोटे नाले, मोठे नाले आणि मिठी नदीमधून गाळ काढण्यासाठी अनुक्रमे ६२, ८० आणि ५७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पर्जन्य जलवाहिन्यांच्या विविध कामांकरिता एक हजार १४९.७४ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका