पावसाळ्यापुर्वी नालेसफाई कशी होणार?
By Admin | Updated: May 4, 2017 06:31 IST2017-05-04T06:31:41+5:302017-05-04T06:31:41+5:30
ठेकेदार मिळत नसल्याने नालेसफाईचे तीनतेरा वाजले असून यंदाच्या पावसाळ्यात पाणी तुंबण्याची भीती नगरसेवक व्यक्त करीत

पावसाळ्यापुर्वी नालेसफाई कशी होणार?
मुंबई: ठेकेदार मिळत नसल्याने नालेसफाईचे तीनतेरा वाजले असून यंदाच्या पावसाळ्यात पाणी तुंबण्याची भीती नगरसेवक व्यक्त करीत आहेत. त्याचवेळी प्रशासन मात्र गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ३५ टक्के नालेसफाईचा दावा करीत सारे काही आलबेल असल्याचे चित्र रंगवत आहे.
पावसाळा तोंडावर असताना मुंबईतील नालेसफाईची कामे कूर्मगतीने सुरू असल्याचे तीव्र पडसाद स्थायी समितीत बुधवारी उमटले. सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत नालेसफाईचे काम ३१ मे पूर्वी कसे होणार? असा जाब विचारला. मात्र आतापर्यंत सहावेळा निविदा काढूनही ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळालेला नसल्याची कबुली प्रशासनाने दिली. ठेकेदार मिळत नसल्याने दक्षिण मध्य मुंबईत नालेसफाई ठप्प असल्याचेही समोर आले.
नाल्यातील गाळ काढून त्याची वाहतूक करण्यासाठीही प्रशासनाला दोनवेळा निविदा काढावी लागली. लहान नाल्यांचे काम एनजीओमार्फत केले जाते आहे. इतर ठिकाणीही कामे अपूर्ण आहेत. आतापर्यंत फक्त १० टक्केच नालेसफाई झाली असेल तर पावसापूर्वी कामे कशी पूर्ण होणार असा सवाल विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी विचारला. मात्र स्थायी समितीत आपली हतबलता व्यक्त करणाऱ्या प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक काढून नालेसफाईसाठी आपली पाठ थोपटली आहे. (प्रतिनिधी)
अशी होणार नालेसफाई
ठेकेदार मिळत नसल्याने लहान नाल्यांची कामे एनओमार्फत केली जात आहेत. ज्या नाल्याच्या ठिकाणी मशिन नेता येणार नाही, अशा ठिकाणी एनजीओमार्फत काम करावेच लागेल. कंत्राटदार मिळत नसतील तर तेथेही एनजीओतर्फे कामे केली जातील असे प्रशासनाने स्पष्ट केले.
अशा आहेत अडचणी
एफ उत्तरमध्ये नाले सफाईचे काम मनुष्यबळाचा वापर करून होणार नाही, याकडे शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांनी लक्ष वेधले.
साकीनाका क्रमांक १०, ११व १३ या नाल्यांच्या ठिकाणी मशीन उतरवणे अशक्य आहे. तेथे एनजीओला कामे द्यायलाच हवी, असे मनसेचे दिलीप लांडे म्हणाले.
मोठे नाले व लहान नाले यांची कामे रेंगाळली आहेत, ही कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत, तर यंदाही नाले तुंबण्याची भीतीही नगरसेवकांनी पालिका स्थायी समितीत व्यक्त केला केली.
प्रशासनाचा दावा
ठेकेदार मिळत नसल्याने नालेसफाईचे काम एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू झाले. तरीही काल परवापर्यंत दहा टक्के नाले साफ झाल्याचे आकडे देणाऱ्या प्रशासनाने २९ एप्रिलपर्यंत मोठ्या नाल्यांच्या सफाईची कामे चक्क ३५.६४ टक्के पूर्ण झाली आहेत. गेल्यावर्षी हेच प्रमाण एप्रिल अखेरपर्यंत ७.५९ टक्के एवढे होते, असा दावा केला आहे.