बिबट्याचे हल्ले कसे रोखावेत?
By सचिन लुंगसे | Updated: May 12, 2025 02:59 IST2025-05-12T02:58:39+5:302025-05-12T02:59:10+5:30
जेणेकरून बिबट्यांचे हल्ले रोखण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश येईल आणि बिबट्यांच्या संवर्धन, संरक्षणास अधिक चालना मिळेल.

बिबट्याचे हल्ले कसे रोखावेत?
सचिन लुंगसे, उपमुख्य उपसंपादक
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या झोपड्या, वनजमिनीवरील झोपड्या, प्राण्यांना महामार्ग ओलांडण्यासाठी मार्गच नसणे (ॲनिमल पासिंग) अशा अनेक आव्हानांचा सामना आता संख्येने ५४ वर आलेल्या बिबट्यांना करावा लागणार आहे. तर दुसरीकडे बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे उद्यानाच्या आसपास राहणाऱ्या मनुष्यवस्तीतही तेवढीच खबरदारी प्रशासकीय यंत्रणा आणि रहिवाशांनाही घ्यावी लागणार आहे. जेणेकरून बिबट्यांचे हल्ले रोखण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश येईल आणि बिबट्यांच्या संवर्धन, संरक्षणास अधिक चालना मिळेल.
उद्यान आणि त्या परिसरात २०१४-१५ दरम्यान सुमारे २३ बिबटे होते. दहाएक वर्षांत त्यांची संख्या ५४ झाली. प्राण्यांच्या अधिवासासाठी अशा प्रकाराचे उद्यान मुंबईत आहे, ही चांगली गोष्ट आहे. बिबट्यांना उद्यान, उद्यान परिसर आणि लगतच्या वनपरिसरात अन्न मिळत असल्याचे यातून अधोरेखित होते. मात्र आता वाढत्या बिबट्यांना उद्यानातच पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. कारण, गेल्या दहाएक वर्षांत बोरीवली, गोरेगाव, पवई, भांडूप आणि मुलुंडमधील मनुष्य वस्तीत बिबट्याने केलेला शिरकाव पाहता असे पुन्हा घडू नये, म्हणून दक्षतेची गरज आहे.
बिबट्याचा वावर ज्या महामार्गालगत आहे तिथे ‘ॲनिमल पासिंग’ बांधले पाहिजेत. कारण, उद्यानामधील बिबटे केवळ उद्यानातच वावरत नाहीत. तुंगारेश्वर अभयारण्य परिसरात आढळलेला एक नर बिबट्या सुमारे ९ किलोमीटर अंतर कापून, घनदाट मानवी वस्त्या, महामार्ग आणि रेल्वे मार्ग ओलांडून वसई किल्ल्यापर्यंत आल्याचे पाहणीत आढळले होते. या घटनेतून बिबट्यांची परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता दिसून येते. बिबट्याचा हा प्रवास केवळ येथेच थांबत नाही. बिबट्यात परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता असेल तर त्याचा अधिवास असलेले क्षेत्र जपण्याची गरज आहे.
बिबट्या, हत्ती आणि सर्वच वन्य प्राणी संवेदनशील असतात. बिबट्याचे मनुष्य हे भक्ष्य नाही. नरभक्षक बिबट्या ही दुर्मीळ आणि आजारपणासारख्या विशिष्ट कारणाने निर्माण होणारी बिबट्यातील स्थिती आहे. अन्यथा बिबट्या, त्याला डिवचल्याशिवाय काहीही त्रास देत नाही.
भटक्या श्वानांच्या प्रजननावर नियंत्रण ठेवले तर बिबट्या भक्ष्याच्या शोधात वस्तीत येण्याचे प्रमाण घटू शकेल. श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी लसीकरणासारखे उपाय योजले पाहिजेत. उद्यानात कोणीही अतिक्रमण करू नये म्हणून संरक्षक भिंती बांधण्यात आल्या आहेत. मात्र संरक्षक भिंती हा यावरचा उपाय नाही. बिबट्यांबरोबरच चितळ, सांबर, रानमांजर, पाम सिव्हेटसारखे सस्तन प्राणी तसेच पिसूरी (माउस डीअर) आणि रस्टी स्पॉटेड कॅटसारख्या प्रजातीही जपल्या पाहिजेत.