Join us

आम्ही किती अवयव वाया घालवतोय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 10:20 IST

जे. जे. रुग्णालयामध्ये सामाजिक संस्थांच्या मदतीने २५ वर्षांपूर्वी ज्येष्ठ नागरिकांचे पाच हजार देहदानाचे (मृत्युनंतर) संमतीपत्र भरून घेतले होते. दहा वर्षांनंतर छाननी केल्यावर असे दिसून आले की, त्यातील २५ लोकांचे देहावसान झालेले आहे व त्यापैकी फक्त दोघांचेच देहदान जे. जे. सगणालयात झाले आहे. यामध्येही जनजागृतीचा अभाव दिसून आला. म्हणूनच लोकमतने सुरू केलेले 'लोकमत जीवनदान' मोहिमेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

डॉ. प्रवीण शिनगारे, माजी संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग

जिवंतपणी आपण मुख्यत्वे दोन अवयव किडनी (दोनपैकी एक) व लिवर (अर्धवट) दान करू शकतो. पण हेच अवयव ब्रेन डेड व्यक्तीचे मिळाल्यास एका जिवंत व्यक्तीला ऑपरेशनला जाण्यापासून वाचवू शकतो. ब्रेन डेड व्यक्तीचे वाया जाणारे अवयव एका रुग्णाला जिवंत ठेवण्यासाठी करू शकतो. मुंबई शहरामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील (केंद्र‌शासन, राज्यशासन व महापालिका) एकूण असलेल्या रग्णालयामधे दोन हजारापेक्षा जास्त खाटा ह्या आय-सी.यु (आतिदक्षता) या गटात मोडतात, वैद्यकिय क्षेत्रातील संशोधनाप्रमाणे या दोन हजार रुग्णापेक्षा कमीत कमी दरराेज १०० रुग्ण हे ब्रेन डेड असू शकतात यांच्यापासून सहजपणे प्रतीदिन १०० लिव्हर, २०० किडनी इत्यादी अवयव मिळू शकतात. पण जनजागृतीच्या अभावामुळे हे होऊ शकत नाही. 

ब्रेन डेड घोषितच होत नाहीत

अतिदक्षता विभागात काम करणाऱ्या डाॅक्टरांवर मोठी जबाबदारी आहे. बहुतांशी डॉक्टरांचा कल हा ब्रेन डेड रुग्ण असला तरी तो जाहीर (केस पेपरवर नोंद) न करण्याकडे असतो. यामध्ये ब्रेन डेड घाेषित करण्याची जी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. ती जबाबद‌ारीची व वेळखावू असते. डॉक्टरने ब्रेन डेड घोषित नाही केले तर ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर, सामाजिक कार्यकर्ता इत्यादी मनुष्यबळ पुढील समुपदेशनाची प्रक्रिया सुरू करू शकत नाहीत. 

तामिळनाडू आणि महाराष्ट्र...

ब्रेन डेडबाबत एक गंमतीशीर फरक असा आहे की, तामीळनाडूमध्ये जास्तीजास्त ब्रेन डेड हे शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रुगणालयात निदान होतात. पण महाराष्ट्रात शासकीय रुग्णालयात नगन्य (झिरो) जाहीर होतात व जळपास ९५% पेक्षा जास्त खाजगी रुग्णालयात हाेतात. या फरकाच्या कारणांचा अभ्यास केला व त्याची अंमलबजावली केली तर तर महाराष्ट्रामध्ये अवयव वाया जाण्याचे प्रमाण कमी होईल.

विदारक वास्तव

अवयवदान जागृतीमध्ये समजा आपण एक लाख लोकांकडून अवयवदानाचे संमतीपत्र भरुन घेतले तर त्यातील फक्त १०० हे रस्ते अपघातात जखमी होतात व यापैकी फक्त १० व्यक्ती ब्रेन डेड अवस्थेत पोहाेचतात. 

आपले टार्गेट एक लाखामध्ये १० ओळखणे हे आहे. या १० पैकी फक्त ५ किंवा ६ व्यक्ती/रुग्णांचे नातेवाइक अवयवदानास तयार होतात. 

यापैकी दोघांचे अवयन ट्रान्सप्लांन्ट करण्यायोग्य नसतात. उर्वरित तीन ते चार रुग्णांचे अवयव उपयोगी असतात. 

हे व अवयव स्विकारणारा रुग्ण, त्याचे राज्य, याचे रुग्णालय, त्याचा ब्लड ग्रुप, हेलिकाॅप्टर, विमानाची सुविधा, ग्रीन कॉरीडॉर, डॉक्टरांच्या चमूची उपलब्धता इत्यादी अडीअडचणीवर मात केल्यावर आपण एका दात्याच्या यशापर्यंत पोहचू शकतो.

हे तीन संकल्प नक्की करा

प्रत्येक भारतीय नागरिकाने तीन संकल्प करणे गरजेचे आहे. माझ्या मृत्युनंतर माझे नेत्रदान करावे व त्यानंतर देहदान करावे तसेच जर दुर्देवाने मी ब्रेन डेड झालो तर माझे सर्व अवयव हे गरजुना दान करावेत. सदरचे संकल्प हे त्यांनी वारंवार नातेवाइक व मित्र यांच्यासमोर व्यक्त करावेत. अवयव दानाच्या संकल्प नोंदनीचे कार्ड शक्यतो खिशात ठेवावे संकल्प करणाऱ्यांनी नातेवाईकाना (जवळच्या) ठणकावून सांगितले पाहीजे की, "माझ्या मृत्युनंतर मी व्यक्त केलेले संकल्प तुम्ही पूर्ण नाही केले तर माझा आत्मा भटकत राहील." अशा प्रकारे धार्मिक किंवा भावनिक भीती घातल्याशिवाय नातेवाईक ऐकत नाहीत. 

नातेवाईक माझ्या अनु‌भवाप्रमाणे अर्थिक संकल्पाबाबत काटेकोर असतात, पण भावनिक संकल्पाबद्दल दक्ष नसतात. याेग्य वेळेला अवयव न मिळाल्यामुळे लाखो रुग्ण दरवर्षी भारतात मरतात. 

अवयव मिळण्याचे मुख्य तीन स्त्राेत 

१) मृत्यू झाल्यावर, २) जिवंतपणी३) ब्रेन डेड झाल्यावर 

भारतात रोज ३५ ते ४० हजार व्यक्ती मृत पावतात. त्यांचे फक्त डोळे व त्वचा दान होते. म्हणजेच भारतात दररोज ३५ हजार मृतदेहाचे प्रत्येकी २ याप्रमाणे ७० हजार डोळे उपलब्ध होतात तरी सुद्धा नेत्र पटल मिळण्यासाठी १० लाख नेत्र रुग्ण प्रतिक्षेत आहेत. मृतांच्या नातेवाईकांच्या परवानगी शिवाय नेत्रदान करता येत नाही. त्यामु‌ळे वापरण्या योग्य नेत्र आपण मृतव्यक्तीबरोबर स्मशानात जाळतो किंवा पुरतो. 

१६०० ब्रेन डेड रुग्णांचे अवयव वाया जातात

रस्ते अपघातात मृत्य पावणाऱ्यांचे प्रमाण जगात सर्वात जास्त म्हणजेच दररोज ४५० ते ५०० मृत्यु हे भारतात आहे. महाराष्ट्रात रस्ते अपघातात डाेक्याला मार लागून ब्रेन डेड झालेले दररोज सरासरी ५ व्यक्ती सापडतील म्हणजेच वर्षाला १८००. पण झोनल ट्रान्सप्लांट केंद्राच्या आकडेवारीवरून असे दिसुन येते की यातील फक्त १०० ते २०० एवढ्यांचे अवयव प्राप्त होतात. म्हणजेच उर्वरित १६०० ब्रेन डेड हे आपण निदानच करत नाहीत पर्याने अवयव वाया घालवताे व कुटुंबातील नातेवाईकास जिवंतपणी अवयव देण्यास भाग पाडतो. 

टॅग्स :अवयव दान