गृहनिर्माण प्रकल्पांत घरे आणि पार्किंग किती?; खरेदीदारांना मिळणार प्रकल्पाची कुंडलीच
By सचिन लुंगसे | Updated: June 5, 2025 20:30 IST2025-06-05T20:30:01+5:302025-06-05T20:30:29+5:30
गृहनिर्माण प्रकल्पांचे महारेरा नोंदणी प्रमाणपत्रच देणार मूलभूत आणि अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती

गृहनिर्माण प्रकल्पांत घरे आणि पार्किंग किती?; खरेदीदारांना मिळणार प्रकल्पाची कुंडलीच
मुंबई : कोणत्याही गृहनिर्माण प्रकल्पांत एकूण किती घरे आहेत. किती गाळे आहेत. इमारत किती मजल्यांची आहे. एकूण किती विंग आहेत. इमारतीला किती मजल्यांची परवानगी आहे ? या आणि अशा माहितीसह इमारतींमध्ये दुचाकीसह चारचाकीसाठीची पार्किंग किती आहे ? अशी सगळी माहिती घर खरेदीदारांना गृहनिर्माण प्रकल्पाच्या नोंदणीप्रमाणपत्राच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे घर घेताना ग्राहकांची फसवणूक तर होणारच नाही. शिवाय ग्राहकांना गृहनिर्माण प्रकल्पाची इंत्यभूत माहितीही मिळणार आहे.
कोणताही ग्राहक घर घेताना आयुष्यभर जमा केलेली पुंजी खर्च करत असतो. अशावेळी एखाद्या गृहनिर्माण प्रकल्पात गुंतवणूक करताना प्रकल्पाच्या बिल्डरसोबत सगळी माहिती ग्राहकाला मिळणे अपेक्षित असते. अनेकवेळा ही माहिती बिल्डरांनाकडून लपविली जाते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते. मात्र भविष्यात ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून महारेराने बिल्डरांवर वचक बसविली आहे. शिवाय घालून दिलेल्या नियमांंनुसार, बिल्डरांना घर खरेदीदारांना सगळी माहिती उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. याचाच एक भाग म्हणून आता गृहनिर्माण प्रकल्पाच्या नोंदणी प्रमाणपत्राच ग्राहकांना मुलभूत व अत्यंत महत्वपुर्ण माहिती मिळणार आहे.
महारेराच्या वेबसाइटवर गेल्यावर गृहनिर्माण प्रकल्पाचा रेरा नंबर टाकला की प्रकल्पाची साइट ओपन होईल. या साइटवर बिल्डरला रेराकडून देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र असेल. या प्रमाणपत्रात ग्राहकांना सगळी माहिती उपलब्ध असेल. त्यानुसार, कोणत्या प्रकल्पांत घर घ्यायचे ? यासाठी ग्राहकांना मदत होईल.
नवीन महारेरा नोंदणी प्रमाणपत्रांची वैशिष्ट्ये
- गृहनिर्माण प्रकल्पाचे व बिल्डरचे नाव, पत्ता, नोंदणीक्रमांक हा तपशील वाचायला, समजायला सोपा जावा म्हणून बुलेट पाॅइंटसमध्ये
- प्रकल्पाचे बांधकाम क्षेत्रफळ
- इमारतीचे, विंगचे नाव / क्रमांक
- प्रकल्पाचे निवास योग्य मंजूर मजले
- निवासी / अनिवासी इमारती किती
- बांधकाम परवानगी किती मजल्यापर्यंत आहे हे दर्शवणारे प्रमाणपत्र (सीसी)
- चारचाकी, दुचाकी, अभ्यागतांसाठी अशी एकूण सर्व पार्किंग किती
- प्रकल्पात भविष्यात काही दुरूस्त्या, मुदतवाढ
- प्रकल्प दुसऱ्या बिडलरला हस्तांतरीत झाला असल्यास तोही तपशील वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रात असणार
पूर्वीच्या प्रमाणपत्रात फक्त प्रकल्प आणि बिल्डरचे नाव, पत्ते एका ओळीत दिले जायचे. आता ही माहिती वाचायला आणि समजायला सोपी जावी यासाठी बुलेट पॉईंट्समध्ये आहे.
बिल्डर हे प्रमाणपत्र प्रकल्पस्थळी, प्रकल्पाच्या वेबसाइटवर अपलोड करतात. प्रकल्पाच्या नोंदणीक्रमांकाच्या मदतीने प्रकल्पाबाबतची माहिती महारेराच्या वेबसाइटवर शोधताना पहिल्याच पानावर या प्रमाणपत्राची लिंक असते.
सर्व माध्यमांतील जाहिरातींमध्ये प्रकल्पाच्या नोंदणीक्रमांकासोबत क्यूआर कोड छापणे पूर्वीच महारेराने बंधनकारक केले आहे. क्यूआर कोड स्कॅन करूनही प्राथमिक माहिती मिळवता येते.
बहुतेकजण आयुष्यभराची कमाई गुंतवून घर घेतात. ही गुंतवणूक संरक्षित राहावी यासाठी महारेरा प्रयत्नशील आहे. गुंतवणूकदाराने सजगपणे वरील बाबी समजावून घेऊन, त्यातील कायदेशीरबाबी तपासून घेऊन सजगपणे व्यवहार करण्याची गरज आहे. - मनोज सौनिक, अध्यक्ष, महारेरा