Join us

लोकल प्लॅटफॉर्मवर किती वेळात येणार? आता मध्य रेल्वेच्या इंडिकेटरवरूनही समजणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 14:10 IST

यंत्रणा महिन्याभरात कार्यान्वित करण्याची मध्य रेल्वेची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: प्लॅटफॉर्मवर लोकल गाडी येण्याचा अपेक्षित कालावधी समजण्यासाठी इंडिकेटरवर तशी व्यवस्था आहे. पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्यांच्या प्लॅटफॉर्म्सवर ही यंत्रणा सुरू आहे. मात्र, मध्य रेल्वेवर ही यंत्रणा अद्यापही सुरू झालेली नाही. येत्या महिन्याभरात ही यंत्रणा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

रेल्वे प्रवाशांना लोकल येण्याच्या वेळेची अचूक माहिती मिळण्यासाठी पश्चिम रेल्वेने २००२ मध्ये ट्रेन इन्फॉर्मशन सिस्टिम (टीएमएस) यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यानुसार आयपी आधारित तंत्रज्ञान वापरून प्लॅटफॉर्मवर ट्रेन येण्याचा अपेक्षित कालावधी दाखवला जातो. मध्य रेल्वेनेसुद्धा टीएमएस यंत्रणा २००८ मध्ये उभारली; परंतु यामध्ये लोकल किती वेळात प्लॅटफॉर्मवर येणार यासाठीचे अद्यावत आयपी तंत्रज्ञान बसवण्यात आले नाही. अशा पद्धतीची यंत्रणा बसवण्याची घोषणा मध्य रेल्वेने गेल्या वर्षी केली होती, मात्र त्याची पूर्तता झालेली नाही.

ईबीएसईटी ट्रॅक डिव्हाइसवरून अचूक माहिती

  • पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरारदरम्यान  आयपी आधारित टीएमएस प्रणाली आहे. ही यंत्रणा ईबीएसईटी ट्रॅक डिव्हाइसवरून लोकलची अचूक माहिती  मिळवते. 
  • या प्रणालीअंतर्गत चर्चगेट ते विरारदरम्यानच्या प्लॅटफॉर्मवर लोकलची अपेक्षित वेळ दर्शवली जाते; परंतु मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मात्र ताटकळत राहावे लागते. 
  • त्यामुळे मध्य रेल्वेवरही ही प्रणाली लवकर सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

कामासाठीचे काढले टेंडर

या आयपी आधारित तंत्रज्ञान कामासाठीचे टेंडर काढण्यात आले आहे. महिनाअखेरपर्यंत ही यंत्रणा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात  असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितले. परंतु मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील ९२ प्लॅटफॉर्म्सवर ही यंत्रणा इतक्या कमी कालावधीत पूर्ण होईल का, याबाबत प्रवाशांकडून शंका उपस्थित केली जात आहे. 

टॅग्स :मुंबई लोकल