एवढे लोक विनासामान स्टेशनवर कसे आले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 02:31 AM2020-04-16T02:31:46+5:302020-04-16T02:32:07+5:30

वांद्रे गर्दी प्रकरण : केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून कसून तपास सुरू

How did so many people come to the station uninvited? | एवढे लोक विनासामान स्टेशनवर कसे आले?

एवढे लोक विनासामान स्टेशनवर कसे आले?

Next

अतुल कुलकर्णी ।

मुंबई : वांद्रे स्टेशनजवळ मंगळवारी अचानक चार-पाच हजार लोक जमले कसे? ही गर्दी नेमकी होती कोणाची? लोक जसे आले तसे क्षणात गेले कसे? असे अनेक प्रश्न आता पोलिसांपुढे आहेत. मुंबई पोलीस तर या घटनेचा शोध घेत आहेतच; शिवाय केंद्रीय गुप्तचर यंत्रणादेखील या सगळ्या प्रकाराचा कसून शोध घेत असल्याची माहिती आहे.

लॉकडाउन वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यानंतर दुपारी अचानक वांद्रे स्थानकात हजारो लोक जमले. दररोज जेथे खाण्यापिण्याच्या वस्तू तसेच धान्य यांचे वाटप ज्या जागेवर केले जाते त्याच जागी लोक जमू लागले. त्यामुळे सुरुवातीस हे लोक त्यासाठी जमत असावेत असे पोलिसांना वाटले. मात्र गर्दी वाढली आणि ‘चलो अपने गाव’ अशी घोषणा सुरू झाली. तेव्हा पोलीस यंत्रणा एकदम सक्रिय झाली. पण पोलिसांनी लाठ्या काढल्या आणि काही वेळात ती गर्दी लगेच गायबही झाली. ती अशी पटकन कशी आणि कुठे निघून गेली? मुंबईच्या अन्य भागात ती गर्दी का दिसली नाही? एरव्ही एखाद्या सभेला किंवा मोर्चाला जमलेली गर्दी बाहेर पडते तेव्हा ती परत जाताना विविध रोडवर दिसते. पण तसेही कुठे दिसले नाही, मग अचानक एवढे लोक गेले कुठे? जाताना कोणत्याही रस्त्यावर हे लोक कसे दिसले नाहीत, याचाही शोध घेतला जात आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे लोक त्याच भागातून आले होते व पोलिसांनी पिटाळून लावताच पुन्हा त्याच भागात ते काही वेळात निघूनही गेले. यात बांगलादेशी मुस्लीमही होते, अशी माहिती हाती आली आहे. त्यादृष्टीनेही शोध चालू आहे.
चौकाचौकांत पोलिसांनी लोकांना अडवून चौकशी सुरू केलेली असताना एवढे लोक कसे जमले? जर हे लोक गावाला जाण्यासाठी आले होते तर त्यांच्याजवळ सामान, बॅगा का नव्हत्या? हे लोक रस्त्यावर बसून घोषणा का देत होते? असे प्रश्न आता पोलिसांना पडले आहेत. त्यातच उत्तर भारतीय महापंचायत अशी संस्था चालविणाºया विनय दुबे याने अनेक प्रक्षोभक भाषणे केली. त्यातून परप्रांतीय लोकांना भडकवण्याचे काम केले गेले. याच दुबेने १८ एप्रिल रोजी सगळ्या परप्रांतीयांना त्यांच्या गावी मोफत नेण्याची व्यवस्था केल्याचे आवाहनही केले होते. त्याच्या या कृतीमागे कोण आहे, याचाही शोध आता घेतला जात आहे. जर या दुबेने ४० गाड्या मुंबईहून उत्तर प्रदेश, बिहारसाठी केल्या असतील, त्यासाठी त्याच्याजवळ पैसे होते तर मग त्याने याच अडकलेल्या लोकांची जेवणाची सोय का केली नाही? याचा अर्थ याच्यामागे निश्चित हेतू होता का? याचाही शोध घेतला जात आहे. मात्र काही भागांत लोकांना खाण्यासाठी मिळत नाही त्यातून हे घडले असावे, असे सांगितले जात आहे.

वांद्रे स्थानकच
का? याचा शोध
केंद्र सरकारच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकाराची चौकशी सुरू केली असून हा प्रकार घडला की मुद्दाम घडवला, यामागे कोणाचा हात आहे का? याचा शोध घेत आहेत. कारण जर लोकांमध्ये खरोखरीच अस्वस्थता होती, त्यांना खाण्यासाठी मिळत नव्हते तर मग हे लोक वांद्रे स्टेशनवर का गेले? ते वांद्रे टर्मिनल्स, कुर्ला किंवा लोकमान्य टिळक या स्थानकांत का गेले नाहीत, या प्रश्नांचा शोध ते घेत आहेत. त्याचवेळी वांद्रे भागातील माजी आ. बाबा सिद्दिकी यांचेही यासाठी सहकार्य घेतले जात असल्याचे समजते.

Web Title: How did so many people come to the station uninvited?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.