अंतर्गत मूल्यमापनात पारदर्शकता कशी आणणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 01:27 AM2021-04-23T01:27:57+5:302021-04-23T01:28:42+5:30

शिक्षण अभ्यासकांकडून अंतर्गत मूल्यमापनावर प्रश्न उपस्थित 

How to bring transparency in internal evaluation? | अंतर्गत मूल्यमापनात पारदर्शकता कशी आणणार ?

अंतर्गत मूल्यमापनात पारदर्शकता कशी आणणार ?

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  इतर मंडळाच्या दहावीच्या परीक्षांप्रमाणे राज्य मंडळाच्या ही दहावीच्या परीक्षा यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्या आहेत. तज्ज्ञांशी चर्चा करून दहावीच्या विदयार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासंदर्भात अंतर्गत मूल्यमापनासाठी निकष ठरविले जातील असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. 
अंतर्गत मूल्यमापनाच्या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रात अनेकांनी स्वागत केले आहे तर अनेकांनी हा पर्याय योग्य नसल्याचेच मत नोंदविले आहे. अंतर्गत मूल्यमापनाचे निकष येत्या काही दिवसांत शिक्षण विभागाकडून जाहीर होणार असले तरी या दरम्यान अंतर्गत मूल्यमापन नेमके कसे आणि कोणत्या परीक्षांच्या आधारावर होणार ? त्यात कितपत पारदर्शकता असेल ? अंतर्गत मूल्यमापनाने इतर मंडळाच्या आणि राज्य मंडळाच्या गुणांत समानीकरण येणार का ? तसेच गुणांच्या कसोटीचे आणि त्याआधारे होणाऱ्या पुढील प्रवेशाना बगल दिली जाणार का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
वर्षभर चाललेल्या ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात सीबीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांचे सर्वंकष सातत्य मूल्यमापन झालेले आहे. स्वाध्याय आणि चाचण्या त्यांच्यकडून सोडवून घेण्यात आल्याने सदर मंडळांकडे अंतर्गत मूल्यमापनाचा निर्णय घेण्यासाठी सबळ कारण आणि पाया आहे. मात्र  गेल्या वर्षभरात दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा पूर्ण बंद आहेत. राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचलेले नाही. या विद्यार्थ्यांनी एकही परीक्षा दिलेली नाही. राज्यातील राज्यातील प्रचलित परीक्षा पद्धतीत अवघ्या २० गुणांचे अंतर्गत मूल्यांकन होते मग अशा वेळेस विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन कोणत्या आधारावर करणार, असा प्रश्न शिक्षण अभ्यासकांनी उपस्थित केला आहे.
सध्याच्या भयावह परिस्थितीत परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल कोणतेही दुमत नसले तरी अंतर्गत मुल्यमापनासाठीच्या पर्यायाची तयारी शिक्षण विभागाला काही महिन्यांपूर्वीच करता आली असती असे मत माजी शिक्षिका प्राची साठे यांनी नोंदविले आहे. सीसीईच्या आठ विविध तंत्राचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करण्याच्या सूचना जरी शाळांना डिसेंबर, जानेवारीपर्यंत मिळाल्या असत्या तरी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची तयारी होण्यासोबतच अंतर्गत मूल्यमापनाला इतर मंडळाप्रमाणे भक्कम आधार मिळाला असता असे मत त्यांनी नोंदविले आहे. याबाबतची तयारी आणि आखणी मंडळ आणि विभागाने आधीच करून ठेवणे अपेक्षित होते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 
अनेक माजी शिक्षण अधिकारी आणि तज्ज्ञांनी मात्र या निर्णयाला बदलांची नांदी म्हणत स्वागत केले आहे. आतापर्यत ३ तासाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचे, क्षमतेचे मूल्यमापन करणे योग्य नव्हतेच मात्र आता अंतर्गत मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांचे वर्षभरातील उपक्रम, शैक्षणिक व सामाजिक वर्तन बदल, मानवी जीवन मूल्ये यांसारख्या प्रासंगिक सूचीचा ही अंतर्भाव होईल ही अपेक्षा माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी व्यक्त केली. पुढच्या काही दिवसांत तज्ज्ञसमिती अंतर्गत मूल्यमापनात कोणत्या मार्गदर्शक निकषांचा समावेश करेल हे जाहीर करणार असून त्यात नक्कीच घोका आणि ओका या मूल्यमापन पद्धतीपेक्षा वेगळ्या सूचनांचा समावेश असेल असे मत त्यांनी नोंदविले. अंतर्गत मूल्यमापनावरून निकाल हा शिक्षण क्षेत्रातील मोठा बदल असेल अशी सकारात्मक बाजू त्यांनी मांडली.

काय असू शकतात पर्याय?
nराज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन करताना सीबीएसई ,आयसीएसई  बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत ते समान असावे लागणार आहे
nराज्यातील काही भागात असाईनमेंट, सराव परीक्षा इतर परीक्षा घेतल्या असतील तर त्याचे सरासरी गुण काढून गुण देताना समान पद्धती राज्यात राबवावी लागणार 
nअकरावी प्रवेशाबाबतसुद्धा निकष ठरवताना त्यात अडचणी निर्माण होणार नाहीत त्या दृष्टिकोनातून मूल्यमापन निकष ठरवावे लागणार 
nसरसकट अंतर्गत मूल्यमापन राज्यस्तरावर अवघड जात असल्यास बहुपर्यायी किंवा सहज शक्य होईल अशा प्रकारची अंतर्गत मूल्यमापनासाठी परीक्षा घेता येऊ शकते का? याबाबत विचार करावा लागेल
nनववी, दहावी एकत्रित अंतर्गत मूल्यमापनाचा पर्यायसुद्धा विचारात घेतला जाऊ शकतो.
 

Web Title: How to bring transparency in internal evaluation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.