Join us  

चालू वर्षात १० टक्क्यांनी वाढणार घरांच्या किमती, महामुंबई परिसरात खरेदीचा ट्रेंड कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 10:27 AM

घरांच्या किमती किमान ८ ते १० टक्क्यांनी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

मुंबई : गतवर्षी २०२३ मध्ये मुंबई व महामुंबई परिसरात विक्रमी संख्येने घरांची विक्री झाल्यानंतर आता चालू वर्षात देखील हाच ट्रेंड कायम राहणार असल्याचा अंदाज गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्याचसोबत घरांच्या किमती किमान ८ ते १० टक्क्यांनी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

गेल्यावर्षी देखील मुंबई व महामुंबई परिसरात घरांच्या किमतीमध्ये २०२२ च्या तुलनेत ७ ते १० टक्के वाढ झाली होती. घरांच्या मागणीमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक नवे प्रकल्प साकारले जात आहेत. त्यामुळे घर बांधणीसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या किमतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.

घरांच्या किमती का वाढणार?

प्रामुख्याने स्टील, रेती, सिमेंट या सर्वच घटकांच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. यामुळे घरांच्या निर्मितीच्या खर्चात वाढ होत आहे. परिणामी, घरांच्या किमती वाढणार आहेत.

किमती वाढूनही घर विक्री जोमात-

घरांच्या किमती वाढत असल्या, तरी घर खरेदीसाठी लोकांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. २०२३ मध्ये प्रामुख्याने ज्या मोठ्या घरांची (किमान टू-बीएच-के किंवा थ्री-बीएच-के) खरेदी झाली, ज्यांचे पूर्वी घर होते, अशा लोकांनीच आपले राहते लहान आकारमानाचे घर विकून मोठे घर घेतले आहे. घर खरेदीमध्ये अशा लोकांचे प्रमाण ३५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर, नव्याने घर घेणारे लोक देखील किमान टू-बीएच-के घर खरेदी करण्यास पसंती देत आहेत. टू-बीएच-के घरांच्या विक्रीचे एकूण गृहविक्रीतील प्रमाण ४२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

जमिनीच्याही किमती महाग -

मुंबई व महामुंबई परिसरात मोकळ्या भूखंडाच्या किमती प्रचंड महाग आहेत. मुंबई शहरात तर मोकळ्या भूखंडाच्या किमती शेकडो कोटी रुपयांच्या घरात आहेत. पुनर्विकासाचे प्रकल्प देखील सुरू आहेत. मूळ रहिवाशांना घरे देऊन नवीन घरांची निर्मिती करणे, हे देखील खर्चीक झाले आहे. पायाभूत सुविधांचे प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे मुंबईपासून या भागाची जोडणी वाढली आहे.  जमिनीच्या किमती वाढल्यामुळे देखील घरांच्या किमतीमध्ये वाढ होताना दिसत आहे.

टॅग्स :मुंबईबांधकाम उद्योग