जिल्ह्यात घरफोड्या वाढल्या
By Admin | Updated: August 14, 2014 00:24 IST2014-08-14T00:24:22+5:302014-08-14T00:24:22+5:30
रायगड जिल्ह्यात चोऱ्या आणि विशेषत: घरफोड्यांच्या गुन्ह्यात गेल्या सहा महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

जिल्ह्यात घरफोड्या वाढल्या
जयंत धुळप, अलिबाग
रायगड जिल्ह्यात चोऱ्या आणि विशेषत: घरफोड्यांच्या गुन्ह्यात गेल्या सहा महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या चोरांनी मंदिरांतील दानपेट्यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले असल्याने ग्रामीण भागात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
माणगांव तालुक्यातील खांदाड गावातील हनुमान मंदिराचे कुलूप तोडून आतील दानपेटी फोडून ३५ ते ४० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केल्याप्रकरणी मंदिराचे पुजारी आप्पा गायकवाड यांनी माणगांव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तर कर्जत तालुक्यातील कुंडलज गावातील श्री गणेश मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून मंदिराच्या आतील दानपेटी व कपाट फोडून ३५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याप्रकरणी एकनाथ भगत यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
खोपोलीमधील मस्को कॉलनीतील रहिवासी नरेंद्रसिंग कुशवाह आणि अजय गुलाबराव खेंगट यांच्या घराची कुलपे तोडून सोने-चांदी दागिने व रोख असा एकूण ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
घरफोडीच्या गुन्ह्यांत वाढ
गतवर्षी जून २०१३ अखेर रायगड जिल्ह्यात मोठ्या चोऱ्या व घरफोडीचे एकूण ३४३ गुन्हे दाखल झाले होते. यात ८० गुन्हे घरफोडीचे होते. यंदा जून २०१४ अखेर जिल्ह्यात मोठ्या चोऱ्या व घरफोड्या एकूण २८६ झाल्या आहेत. त्यामध्ये ८७ घरफोड्या होत्या. त्यातील नऊ घरफोड्या उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गेल्या सहा महिन्यात ७ घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. परंतु या चोऱ्या व घरफोड्यांच्या गुन्ह्यांना पूर्णपणे प्रतिबंध मात्र होवू शकलेला नाही.
जी मंदिरे गावापासून थोडी दूर असल्याचे दिसून येते, परिणामी रात्री तेथे नेमके काय घडते, हे थेट सकाळीच लक्षात येते. या पार्श्वभूमीवर मंदिराच्या विश्वस्त वा मंडळाने दानपेटीतील रोकड दररोज काढून बँकेत ठेवण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर घरफोड्यांना पकडण्याकरिता जिल्ह्यात विशेष नियोजन अमलात आणले असून ते पोलिसांच्या रात्रगस्ती यंत्रणेच्या बरोबरीने जिल्ह्यात कार्यरत राहाणार असल्याचे राजा पवार यांनी अखेरीस सांगितले.