यजमान अमर हिंद उपांत्य फेरीत
By Admin | Updated: January 10, 2017 04:07 IST2017-01-10T04:07:29+5:302017-01-10T04:07:41+5:30
रंगतदार झालेल्या सामन्यात यजमान अमर हिंद मंडळ संघाने विजय क्लबचा १२-११ असा पराभव करून मुंबई जिल्हा अजिंक्यपद

यजमान अमर हिंद उपांत्य फेरीत
मुंबई : रंगतदार झालेल्या सामन्यात यजमान अमर हिंद मंडळ संघाने विजय क्लबचा १२-११ असा पराभव करून मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निमंत्रित खो-खो स्पर्धेच्या १८ वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर पुरुषांच्या गटात बलाढ्य सरस्वती स्पोटर््स क्लबनेही उपांत्य फेरी गाठली.
अमर हिंद मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या या स्पर्धेच्या मुलांच्या गटात उपउपांत्य फेरीत यजमानांच्या तरुण मिस्त्री (३.२०, २.५० मिनिटे), साईनाथ पाटील (२.१० मिनिटे) आणि प्रसाद भाटकर (२.२० मिनिटे) यांनी संरक्षणात आपली छाप पाडली. आक्रमणातही या त्रिकूटाने दिमाखदार खेळ करत निर्णायक अष्टपैलू कामगिरी केली. प्रसादने ३ तर तरुण आणि साईनाथने प्रत्येकी एक गडी बाद केला. विजय क्लबच्या प्रणय प्रधान (३ व ३.५० मिनिटे संरक्षण, २ गडी) व विशाल मैत्री (२ व १.५० मिनिटे संरक्षण, ३ गडी) या जोडीने कडवी झुंज दिली. मात्र मोक्याच्या क्षणी यजमान संघाने वेगवान खेळ करत सामन्यात १२-११ अशा एका गुणाच्या फरकाने विजय मिळवला.
पुरुषांच्या सामन्यात सरस्वती स्पोटर््स क्लबने श्री सह्याद्री संघावर १४-१३ असा विजय मिळवत आगेकूच केली. सरस्वतीच्या विजयात सुशील दहिंबेकर (२.२० व १.५० मिनिटे, २ गडी) आणि श्रेयस राऊळ (नाबाद २ मिनिटे व ३ गडी) यांनी निर्णायक अष्टपैलू खेळी करताना संघाच्या विजयामध्ये मोलाचे योगदान दिले. तर पराभूत सह्याद्री संघाकडून आशिष राणेचे २.१० मिनिटांचे दमदार संरक्षण अपयशी ठरले.
त्याचप्रमाणे, संकेत सावंतने आक्रमणात लक्षवेधी कामगिरी करताना सरस्वती संघाचे ४ गडी बाद करून त्यांच्या आक्रमणाला खिंडार पाडले. मात्र, इतर खेळाडूंकडून आक्रमणात अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने त्याची झुंज अखेर अपयशी ठरली. (क्रीडा प्रतिनिधी)